दौंड भाजपला मोठा धक्का : माजी शहराध्यक्ष स्वप्नील शहा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार
दौंड – भारतीय जनता पक्षाला (भाजप) दौंडमध्ये मोठा धक्का बसणार आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष स्वप्नील शहा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असून ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश सोहळा दिनांक 17 ऑक्टोबर रोजी दौंड येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
आर जे न्यूज 27 मराठीशी बोलताना स्वप्नील शहा यांनी सांगितले की, “मी भाजपा पक्षावर नाराज नाही. मात्र स्थानिक स्तरावर काही मतभेद निर्माण झाल्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “दौंड शहर आणि तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची वाढती ताकद पाहता मला वाटते की विकासासाठी आणि कार्यकर्त्यांना योग्य न्याय देण्यासाठी हा योग्य निर्णय आहे. आम्ही आगामी नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ताकदीने मैदानात उतरणार आहोत.”
या पक्षप्रवेश कार्यक्रमात दौंड शहरासह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते स्वप्नील शहा यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. या घडामोडीमुळे दौंड तालुक्यातील राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजकीय वर्तुळात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू असून, स्वप्नील शहा यांचा प्रवेश हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी भाजपसाठी मोठा धक्का ठरू शकतो.
आर जे न्यूज २७ मराठी साठी — दौंड तालुका प्रतिनिधी विकास साळुंके











