बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार
शिरूर प्रतिनिधी / अल्लाउद्दीन अलवी

शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील प्रतिष्ठित व जुनी संस्था बाभुळसर बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था हिची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. १८ मार्च १९६४ रोजी सहकार कायदा नियम १९६० अन्वये स्थापन झालेली ही संस्था सहकार चळवळीतील आदर्श मानली जाते. संस्थेचे संस्थापक आधारवड स्व. संपत आबा नागवडे व स्व. वाल्मिक दादा नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा आजवर उल्लेखनीय प्रवास घडला आहे.
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन संतोष नानासाहेब नागवडे होते. त्यांनी प्रास्ताविकामध्ये माहिती देताना सांगितले की संस्थेची एकूण सभासद संख्या ५७२ असून, संस्थेचा ऑडिट वर्ग “अ” आहे. भागभांडवल ६१ लाख ८७ हजार ८९५ रुपये, बँक कर्ज २ कोटी ३४ लाख ८४ हजार ३१४ रुपये, तर मेंबर कर्ज २ कोटी ६२ लाख रुपये इतके आहे. यावर्षी संस्थेला तब्बल १४ लाख २६ हजार ७१० रुपयांचा नफा झाला असून आर्थिक स्थिती अत्यंत सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेचे सचिव संजय बबन नागवडे यांनी सभेतील विषय, मागील सभेचे इतिवृत्त, अंदाजपत्रक व ताळेबंद वाचून दाखवले.
या वेळी निवृत्त कृषी अधिकारी अंकुश आबा नागवडे, खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन बाळासाहेब नाना नागवडे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामचंद्र आण्णा नागवडे व सरपंच दिपाली नागवडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना रामचंद्र आण्णा नागवडे म्हणाले की, संस्थेची संपत्ती स्थिती अभिमानास्पद असून संचालक मंडळ उत्तमरीत्या कार्यरत आहे. सभासदांनी वेळेवर कर्जफेड करून संस्थेला अधिक नफ्यात आणावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बाळासाहेब नागवडे यांनी संस्थेच्या संचालक मंडळाचे तसेच खरेदी विक्री संघाचे विशेष आभार मानले.
सभेचे सूत्रसंचालन अल्लाउद्दीन अलवी यांनी केले, तर आभार प्रदर्शन तंटामुक्ती समिती अध्यक्ष अरुण दादा नागवडे यांनी मानले.











