राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद बैठक पार पडली

दौंड तालुक्यातील बोरी पारधी (बोरमलनाथ मंदिर सभागृह) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) तर्फे पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद बैठक पार पडली. या बैठकीसाठी पुणे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, रामभाऊ टुले, प्रमोद गोतारने, डॉ. वंदना मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते

बैठकीत येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांसाठी पक्षाचा पाया मजबूत करण्याचे उद्दिष्ट ठेवून बूथ कमिटी व बूथ रचना कशी उभी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पक्षाची ताकद ही तळागाळातील कार्यकर्त्यांवर अवलंबून असल्याने प्रत्येक पदाधिकाऱ्याने काटेकोरपणे नियोजन करून कामाला लागण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.

या प्रसंगी पुणे जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद गोतारने यांनी आपल्या भाषणात, “गेलेले ते कावळे, राहिलेले मावळे… आता पक्षासाठी झटून काम करायचं आहे. आपण सगळ्यांनी एकदिलाने मेहनत घेतली तर दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला ठरेल,” असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
बैठकीचा समारोप करताना सचिन काळभोर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
आरजे न्यूज २७ मराठी साठी दौंड तालुका प्रतिनिधी – विकास साळुंके











