नाशिक येथे राज्यस्तरीय कार्यालयीन कर्मचारी संघटन प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार

नाशिक – महाराष्ट्र राज्य, गृहमंत्रालयातील कार्यालयीन कर्मचारी संघटन सदस्य व पदाधिकाऱ्यांसाठी नाशिक येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर दि. १३ व १४ सप्टेंबर २०२५ रोजी यशस्वीपणे संपन्न झाले. या शिबिरात राज्यातील विविध विभागांमधील एकूण ७२ जणांनी सहभाग घेतला.

या शिबिरामध्ये वैयक्तिक विकास, संघटन कौशल्ये, संघटनात्मक कामकाजातील अडचणी, कायदे व नियमावली, माहिती अधिकार कायदा, कर्मचारी हक्क व जबाबदाऱ्या अशा विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मोटिवेशनल ट्रेनर श्री. अमर घाणे यांच्या प्रभावी व्याख्यानाने झाले. तर दुसऱ्या दिवशी उद्घाटन कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून शहीद गजानन सोनवणे यांचे भाऊ श्री. सुरेश सोनवणे, तसेच माजी सैनिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

शिबिरामध्ये प्रा. सुशील किल्लोटकर यांनी ‘शहीद गजानन सोनवणे – एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ या विषयावर व्याख्यान दिले. तसेच अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कार्यालयीन कर्मचारी संघटना श्री. गणेश देशमुख यांनी संघटनेच्या भविष्यातील वाटचालीवर सविस्तर मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण शिबिरात विविध व्याख्याते म्हणून श्री. प्रफुल्ल झोळे, श्री. अनिल पाटील, श्री. गणपत गोरे, श्री. श्याम साळवे, श्री. दीपक पुञ्जारी, श्री. राघव चव्हाण, श्री. योगेश टाकळकर, श्री. मिलिंद शिंदे, श्री. जगन्नाथ जगताप आदींनी आपले मार्गदर्शन केले.

शिबिराच्या समारोप प्रसंगी श्री. विशाख काटकर, साहित्यिक व राज्यशिक्षक पुरस्कार विजेते यांनी उपस्थितांना संबोधित करताना संघटनात्मक बांधिलकी व शिस्तीचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. प्रफुल्ल झोळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. वंदना साळवे यांनी मानले.
या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरामुळे कार्यालयीन कर्मचारी संघटन सदस्यांमध्ये संघटन कार्याबाबत उत्साह, आत्मविश्वास व कार्यक्षमतेची नवी ऊर्जा निर्माण झाल्याचे प्रतिपादन करण्यात आले.











