गरजू मुलींसाठी मोफत निवासी ‘एएनएम’ परिचारिका प्रशिक्षणाची संधी

जनसेवा फाउंडेशनतर्फे कुमुदबेन मदनभाई सुरा स्कूल ऑफ नर्सिंग यांच्या सहकार्याने गरजू मुलींसाठी दोन वर्षांचा निवासी ‘एएनएम’ परिचारिका प्रशिक्षणवर्ग मोफत सुरू करण्यात आला आहे. या प्रशिक्षणाला भारतीय नर्सिंग कौन्सिल व महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मान्यता प्राप्त आहे.

संस्थेमार्फत प्रशिक्षण कालावधीत शिक्षणासोबतच भोजन, निवास आदी आवश्यक सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रशिक्षणासाठी पात्रता म्हणून उमेदवार बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून वयोमर्यादा १७ ते ३५ वर्षे आहे. विशेषतः अनुसूचित जाती-जमाती, भटक्या-विमुक्त प्रवर्गातील तसेच ग्रामीण व आदिवासी भागातील मुलींना प्रवेशामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले दहावी-बारावीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रहिवासी पुरावा व छायाचित्र यांसह येत्या २५ सप्टेंबरपर्यंत फाउंडेशनच्या नवी पेठ येथील इंदुलाल कॉम्प्लेक्समधील (पहिला मजला) कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा यांनी केले आहे.












