February 9, 2026 5:12 pm

शिरूर तालुक्यात पावसाचा थैमान; कांदा पिकाचे मोठे नुकसान, शेतकरी चिंताग्रस्त

शिरूर तालुक्यात पावसाचा थैमान; कांदा पिकाचे मोठे नुकसान, शेतकरी चिंताग्रस्त

शिरूर 
शिरूर तालुक्यात गेल्या रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागात हाहाकार माजला आहे. काही तासांतच झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या, नाले ओसंडून वाहू लागले असून शेतांमध्ये पाणी साचून पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

विशेषतः कांदा पिकावर या पावसाचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. सध्या खरीप हंगामातील कांद्याची लागवड जोमात सुरू असतानाच अचानक आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकरी मोठ्या खर्चाने बियाणे, खते, मजुरी, पाणी व्यवस्थापनासाठी पैसे गुंतवून बसले असताना, काही तासांच्या पावसाने मेहनतीचे सर्व श्रम पाण्यात गेल्याचे चित्र दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट असल्याने पिके चांगल्या स्थितीत होती. शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची आशा वाटत असतानाच निसर्गाच्या या अनपेक्षित आघातामुळे शेतकरी वर्गात चिंता व हतबलता पसरली आहे. पिके पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने कांद्याची रोपे कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिरूर तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांनी प्रशासनाला मागणी केली आहे की, तात्काळ नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी. “आम्ही कर्ज काढून पिके लावली, आता सगळं पाणी पडलं आहे. जर सरकारने मदत केली नाही, तर आम्हाला जगणे कठीण होईल,” अशी भावना स्थानिक शेतकरी व्यक्त करत आहेत.

याशिवाय, सतत बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण अधिकच वाढली आहे. शेतमालाला बाजारात योग्य दर मिळत नसतानाच आता पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आत्मिक व आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रशासनाने तत्काळ मदतीचे आश्वासन दिले तरी प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या हाती कधी पोहोचते हा प्रश्न आहे.

शेतकरी संघटनांनीही जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले असून, योग्य तो उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Advertisements

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें