पुण्यात मुसळधार पाऊस; खडकवासला धरणातून विसर्ग वाढला, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Rjnews27marathi
पुणे जिल्ह्यात काल (रविवार) संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास पुणे शहरासह उपनगरांमध्ये विजांचा कडकडाट, गडगडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाने थैमान घातले.

धरणक्षेत्रात पावसाचा जोर – मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
पावसाचा जोर विशेषत: धरणक्षेत्रात वाढल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला आहे. वरसगाव, पानशेत आणि टेमघर धरण क्षेत्रात सतत पावसामुळे खडकवासला धरणात पाण्याची आवक वाढली आहे. परिणामी, आज (सोमवार) सकाळी १० वाजल्यापासून मुठा नदीपात्रात १४ हजार ५४७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग, स्वारगेट येथील उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, नदीपात्राजवळ न जाण्याचे आवाहन केले आहे.

शहरात पाणी साचले, शाळांना सुट्टी
पुणे शहरातील मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हडपसर परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हवामान विभागाचा अलर्ट
भारतीय हवामान विभागाने पुढील काही तास अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगत पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, वादळासह पाऊस पडण्याची शक्यता असून ताशी ३०-४० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.

प्रशासनाची तयारी
पावसाचा जोर वाढल्याने आणि नदीपात्रात विसर्ग सुरू झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. काही गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेने नागरिकांना गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.
परतीच्या पावसाचा प्रभाव
परतीचा पाऊस सुरू होताच राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी लागली आहे. मुंबई, पुणे यांसह राज्यातील विविध जिल्ह्यांत काल सायंकाळपासून ते आज पहाटेपर्यंत संततधार सुरूच आहे.












