February 9, 2026 5:34 pm

साबळेवाडी येथे विजेच्या धक्क्याने बापलेकाचा विहीरीत मृत्यू; संपूर्ण गाव शोकसागरात…

साबळेवाडी येथे विजेच्या धक्क्याने बापलेकाचा विहीरीत मृत्यू; संपूर्ण गाव शोकसागरात

टाकळी हाजी (ता. शिरूर) : प्रतिनिधी- अर्जुन शेळके

शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी (साबळेवाडी) येथे शुक्रवारी (दि.५) सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. विजेच्या करंटमुळे बापलेकाचा विहीरीत मृत्यू झाल्याने गावभर हळहळ व्यक्त होत असून, या हृदयद्रावक घटनेने प्रत्येकाचे डोळे पाणावले आहेत.

या घटनेत सुदाम सुभाष गाढवे (वय ४३) आणि त्यांचा मुलगा भारत सुदाम गाढवे (वय १७) यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुदाम गाढवे विहिरीवरील मोटर सुरू करण्यासाठी गेले होते. बराच वेळ उलटूनही ते परत न आल्याने त्यांचा मुलगा भारत त्यांना शोधत विहिरीकडे गेला. विहिरीत वडिलांना पडलेले पाहून त्याने जीवाच्या आकांताने मित्राला हाक मारत स्वतःच विहिरीत उडी घेतली. मात्र पाण्यात उतरलेल्या करंटचा जबर धक्का बसल्याने क्षणभरात बापलेकाने प्राण गमावले.

भारतच्या मित्राने आरडाओरडा करत ग्रामस्थांना बोलावले. तातडीने वीजपुरवठा बंद करून गावकऱ्यांनी दोघांना विहिरीतून बाहेर काढले. मात्र दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सुदाम गाढवे हे वारकरी संप्रदायातील भक्तिमय कार्यात अग्रेसर होते. दरवर्षी टाकळीकर प्रासादिक दिंडीसोबत ते देहूपासून पंढरपूर वारीत सहभागी होत असत. भजनी मालिकेत त्यांचे योगदान लक्षणीय होते. तर मुलगा भारत हा बापूसाहेब गावडे विद्यालयात अकरावीला शिकत होता. तो हुशार, शांत आणि सर्वांचा लाडका विद्यार्थी होता.

गाढवे कुटुंब मूळचे नगर जिल्ह्यातील नांदूर पठारचे असून टाकळी हाजी येथे स्थायिक झाले होते. दूध व्यवसायातून त्यांनी संसाराची गाडी पुढे नेली होती. त्यांच्या घरी दहा-पंधरा जर्सी गाई असून रोज शंभर लिटर दूध डेअरीत जात असे.

आज अचानक आलेल्या या दुर्दैवी घटनेने गाढवे कुटुंबावर दुःखाचा काळोख पसरला आहे. आईसमोर एकाचवेळी नवऱ्याचा आणि लेकराचा मृतदेह पाहण्याची वेळ आली… अश्रूंचा पूर आवरला जात नाही.

या दुर्घटनेने संपूर्ण टाकळी हाजी गाव शोकसागरात बुडाले आहे. बापलेकाचा अकाली मृत्यू हा केवळ एका कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण गावासाठी काळीज पिळवटून टाकणारा ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Advertisements

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें