आमदाबाद फाट्यावर पोलिसांची धडक कारवाई : दोन तरुण अटकेत, ३ पिस्तुले व १० काडतुसे जप्त
शिरूर (प्रतिनिधी) RJNEWS27MARATHI. COM
शिरूर तालुक्यातील आमदाबाद फाटा परिसरात अवैध शस्त्रास्त्रांसह फिरणाऱ्या दोन तरुणांना शिरूर पोलिसांनी अटक करून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ३ पिस्तुले, १० जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी असा मिळून १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुप्त माहितीवरून कारवाई
१९ ऑगस्ट रोजी रात्री शिरूर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, दोन संशयित दुचाकीवरून आमदाबाद फाट्यावर फिरत आहेत. तातडीने पोलिसांनी सापळा रचून दुचाकी थांबवली. तपासणीदरम्यान त्यांच्या जवळ दोन पिस्तुले व दहा काडतुसे आढळली. पुढील तपासात आरोपींपैकी एकाच्या घरातून आणखी एक पिस्तुल पोलिसांनी जप्त केले.
अटक आरोपी
या कारवाईत अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे आहेत :
समीर उर्फ नवाब वजीर शेख (वय २०, रा. शिरटे, ता. वळवा, जि. सांगली)
दिपक शिवलिंग वांगणे (वय २०, रा. अमरदिप सोसायटी, कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे)
दोघांवर भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, न्यायालयाने त्यांना १ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांची कामगिरी
ही कारवाई शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व त्यांच्या पथकातील जवानांनी केली. शिरूर पोलिसांनी केलेल्या या धाडसी कामगिरीमुळे परिसरात अवैध शस्त्रास्त्रांच्या हालचालींवर आळा बसण्यास मदत होणार आहे.
समाजात निर्माण झालेली चिंता
अवैध शस्त्रास्त्रांचा वापर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या कारवाया चिंताजनक ठरत आहेत. ग्रामीण भागातही पिस्तुले व काडतुसे अशा धोकादायक वस्तू सहजपणे उपलब्ध होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेसमोरील आव्हाने वाढू लागली आहेत. पोलिसांच्या दक्षतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे.











