रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूच्या नशेत मुलाकडून वडिलांवर प्राणघातक हल्ला
प्रतिनिधी-rjnews27marathi.com
शिरुर, दि 22 ऑगस्ट 2025 – रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत निमगाव भोगी येथे दारूच्या नशेत मुलाने स्वतःच्या वडिलांवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
फिर्यादी चंद्रकांत श्रीपती शेवाळे (वय 64 वर्षे, धंदा – शेती, रा. शेवाळेमळा, निमगाव भोगी, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा आरोपी सुहास चंद्रकांत शेवाळे (वय 38 वर्षे) हा दि. 22 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास दारूच्या नशेत घरी आला. त्याने कोणतेही कारण नसताना फिर्यादीच्या पत्नीला शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली.
यावेळी फिर्यादीने मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी सुहास याने वडिलांनाच शिवीगाळ करून चाकूने हनुवटीवर, गळ्यावर व उजव्या खांद्याजवळ गंभीर वार केले. या हल्ल्यात फिर्यादी स्वतः जखमी झाले.
या घटनेबाबत गुन्हा रजिस्टर क्र. 292/2025 अन्वये भारतीय दंड विधान कलम 118(2), 352, 351(2), 351(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपीला पोलीसांनी त्याच दिवशी म्हणजेच 22 ऑगस्ट रोजी सकाळी 06:32 वाजता अटक केली असून तपास पोलीस हवालदार 2423 ढगे यांच्या कडे सुरू आहे. नोंद पोलीस हवालदार 2432 पवार यांनी केली आहे.
ही माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, रांजणगाव पोलीस ठाणे यांनी दिली आहे.











