पुण्यात मोठी कारवाई: शिरूरमध्ये बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांची उघडकीस आणलेली टोळी, चार जणांना अटक
रांजणगाव, पुणे (दि. 12 जुलै 2025):

शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे मागील दोन वर्षांपासून कोणत्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई दहशतवाद विरोधी शाखा पुणे ग्रामीण व रांजणगाव पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, काही परदेशी नागरिक हे कारेगाव परिसरात अवैधरीत्या वास्तव्यास असून, त्यांनी बनावट भारतीय ओळखपत्रे वापरून वास्तव्य केले आहे. त्यानुसार 11 जुलैच्या सायंकाळपासून रात्रीपर्यंत छापेमारी करण्यात आली. या कारवाईत चार बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले.
तपासात असे समोर आले की हे सर्व आरोपी मूळचे बांगलादेशातील विविध जिल्ह्यांतील असून, भारतीय सीमेमधून बेकायदेशीर मार्गाने देशात प्रवेश करून, कोणत्याही वैध ओळखीशिवाय महाराष्ट्रात वास्तव्य करत होते. त्यांनी बनावट आधार कार्डसारखी कागदपत्रे बनवून दोन वर्षांपासून स्थानिकांमध्ये मिसळून राहण्याचा प्रयत्न केला होता.
अटक करण्यात आलेले चारही आरोपी सध्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे वास्तव्यास होते. कारवाईनंतर त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, त्यांच्याशी संबंधित इतर बेकायदेशीर व्यवहार किंवा नेटवर्क आहे का, याचाही तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे आणि दहशतवाद विरोधी शाखेचे अधिकारी प्रकाश पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस अंमलदार मोसीन शेख, PSI अविनाश थोरात, ASI गव्हाणे, शिंदे, व इतर पोलीस कर्मचारी सहभागी होते.
ही घटना परिसरात खळबळजनक ठरली असून, परकीय नागरिकांकडून देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ नये यासाठी ही वेळीच उचललेली कारवाई महत्त्वाची ठरत आहे.
✍️ रिपोर्ट – RJNEWS27MARATHI.COM
???? ठिकाण – रांजणगाव, पुणे











