शेतकऱ्यांसाठी दिलासा! पीएनबी पुणे विभागातर्फे ‘कृषी संपर्क कार्यक्रम’ संपन्न; शंभरहून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग
रांजणगाव– प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि ग्रामीण भागातील पतपुरवठा वाढवण्यासाठी पंजाब नॅशनल बँक, पुणे विभाग यांच्या वतीने रांजणगाव आणि बारामती येथे भव्य ‘कृषी संपर्क कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला. या उपक्रमात १०० हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असून, अनेक पात्र शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज मंजूर करून दिलासा देण्यात आला आहे.
कार्यक्रमात बचत गट, कृषी उद्योजक व शेतकऱ्यांसाठी बँकेच्या तसेच भारत सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी ‘डिजी एसएचजी लोन’, ‘डिजी गोल्ड लोन’ आणि ‘डिजी किसान इन्स्टंट लोन’ अशा आधुनिक डिजिटल कर्ज साधनांचे प्रात्यक्षिक देखील सादर करण्यात आले.
या कार्यक्रमाला पुणे विभागाचे मंडळ प्रमुख देवेंद्र सिंह, कॉर्पोरेट कार्यालय नवी दिल्ली येथील महा व्यवस्थापक श्रीमती राजश्री जाधव, रांजणगावच्या कृषी अधिकारी श्रीमती धनश्री चासकर आणि सरपंच श्रीमती सुवर्णा वायदंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बँकेच्या योजनांची सविस्तर माहिती सहाय्यक महा व्यवस्थापक श्रीनिवास रेड्डी आणि वरिष्ठ शाखा व्यवस्थापक विठ्ठल माने यांनी दिली.
देवेंद्र सिंह यांनी शेतकऱ्यांना बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले, तर राजश्री जाधव यांनी पीएनबीच्या डिजिटल योजनांची सखोल माहिती दिली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी बँकेच्या तत्पर सेवांचा विशेष उल्लेख करून कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजीव कुमार राय यांनी सर्वांचे आभार मानले. हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.











