🔥 “दुसरे छत्रपती शिवाजी झालो असतो!” – इंग्रज अधिकाऱ्याच्या उद्गारांना स्मारकातून प्रत्युत्तर; बाभुळसर बुद्रुकमध्ये आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक स्मारकासाठी ग्रामपंचायतीची ना-हरकत मंजूर 🔥
अल्लाउद्दीन अलवी, प्रतिनिधी | बाभुळसर बुद्रुक, ता. शिरूर, पुणे | दि. ५ जुलै २०२५
बाभुळसर बुद्रुकच्या मातीचा अभिमान फुलवणारी आणि इतिहासात कोरलेली एक नवी पायरी – आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी ग्रामपंचायतीने अधिकृत ना-हरकत प्रमाणपत्र देत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे!
१७९१ मध्ये जन्मलेले आणि १६ फेब्रुवारी १८३१ रोजी बाभुळसर बुद्रुक गावातून इंग्रजांविरोधात पहिला जाहीरनामा प्रसिद्ध करणारे उमाजी नाईक हे खरं तर “स्वातंत्र्यलढ्याचे पहिले मशालधारक” होते. इंग्रज अधिकाऱ्यानेच, कॅप्टन मेकॅनटॉस याने म्हटले होते की, ” आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक पकडले गेले नसते तर ते दुसरे छत्रपती शिवाजी झाले असते, आणि भारताला तेव्हाच स्वातंत्र्य द्यावे लागले असते!“
हीच क्रांतीची ठिणगी पुन्हा पेटवण्यासाठी बाभुळसर बुद्रुक ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. ग्रामपंचायत कार्यालयात ३० जून २०२५ रोजी झालेल्या मासिक सभेत विषय क्रमांक ५ व ठराव क्रमांक ५ नुसार बहुमताने हा ठराव मंजूर करण्यात आला.
या ठरावानंतर सरपंच दिपाली महेंद्र नागवडे यांच्या हस्ते ना-हरकत प्रमाणपत्र श्रीकांत स्वरूप खोमणे यांना देण्यात आले. यावेळी महेंद्र नागवडे. ग्रामविकास अधिकारी यु. डी. गायकवाड, पत्रकार अल्लाउद्दीन अलवी, संगणक परिचारक अमित नागवडे, शिपाई संतोष भंडलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सरपंच दिपालीताई नागवडे म्हणाल्या, “हे स्मारक म्हणजे केवळ दगडांची रचना नाही, तर आपल्या क्रांतिकारक वारशाला अर्पण केलेली श्रद्धांजली आहे. येत्या काळात हे ठिकाण एक पर्यटन केंद्र होईल आणि बाभुळसरचं नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचेल.”
श्रीकांत खोमणे यांनी पुढील शासकीय स्तरावर पाठपुराव्याची जबाबदारी घेतली असून, राज्य सरकारच्या सहकार्याने स्मारकाच्या अधिकृत मान्यतेसाठी प्रयत्न सुरू आहेत.
🏛️ इतिहास जागा होतोय… एक नवा क्रांतीचा अध्याय लिहिला जातोय!
आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना योग्य सन्मान मिळवून देण्यासाठी बाभुळसर बुद्रुक सज्ज!