सागर पाटोळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागातर्फे सत्कार; “बेरोजगारांसाठी सहकार्य करण्याचा निर्धार”
शिरूर प्रतिनिधी
राजगुरुनगर सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सागर शेठ पाटोले यांचा पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उद्योग विभागातर्फे भव्य सत्कार करण्यात आला. हा सत्कार समारंभ राजगुरुनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभाग कार्यालयात उत्साहात पार पडला.
या वेळी जिल्हाध्यक्ष नितीन गुरव यांच्या हस्ते सागर पाटोळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास उद्योग विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत कदम, अभिजीत आपटे, राजगुरुनगर शहराध्यक्ष योगेश कर्नावट, तालुका उपाध्यक्ष रंगनाथ सुतार, सरचिटणीस अजय तोरकडे, अनिकेत धनवडे, संतोष कोकणे, शहराध्यक्ष सुभाष होले, वैभव नाईकरे, प्रवीण निसर्गगंध, वसीम पटेल, प्रथमेश सांडभोर, निलेश गीते, सागर येळवंडे, सागर अल्हाट यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना अध्यक्ष सागर पाटोळे यांनी सांगितले की,
“राजगुरुनगर सहकारी बँकेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार तरुण, महिला, व लघुउद्योगांकरिता विविध कर्ज योजना राबवण्यात येतील. बँक केवळ आर्थिक संस्था न राहता सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था बनेल. जिल्ह्यातील बेरोजगारी कमी करून नवउद्योजकांना प्रोत्साहन देणे हे आमचे प्रमुख ध्येय राहील.”
जिल्हाध्यक्ष नितीन गुरव यांनी सांगितले की, “माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग विभागातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
हा सत्कार समारंभ केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता, पुढील उद्योग व रोजगारवाढीच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरला आहे, असे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.