गंभीर मारहाण व जीवाला धोका: बाभुळसरमध्ये कुटुंबावर हल्ला; आठ जणांविरोधात गुन्हा दाखल
रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाभुळसर खुर्द येथे 29 जून 2025 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास गंभीर हल्ल्याची घटना घडली आहे. वृंदावन लॉन्स शेजारी राहणाऱ्या मनोज कुमार जगरनाथ सिंह यांच्या घरासमोर जमाव जमवून त्यांच्या कुटुंबावर भयंकर हल्ला करण्यात आला.
फिर्यादी मनोज सिंह यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या पत्नी बबीतादेवी यांनी शेजारी राहणाऱ्या सविता संदीप रामफले यांना पपईचे झाड तोडल्यामुळे सांडपाण्याचा पाइप फुटून नुकसान झाल्याची तक्रार केली होती. त्यावरून संतप्त झालेल्या सविता रामफले, संदीप रामफले, आकाश रामफले, आकाश लहाने व त्यांचे आईवडील (नाव अज्ञात) आणि दोन अनोळखी इसमांनी मिळून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबावर लोखंडी रॉड, दगड, बांबू व लाथाबुक्क्यांनी हल्ला केला.
या हल्ल्यात बबीतादेवी यांना डोक्याला, हातापायाला गंभीर मार लागला असून, स्वतः फिर्यादी मनोज सिंह आणि त्यांचा अल्पवयीन मुलगा आदर्शकुमार यांनाही मारहाण झाली. डोक्याला, चेहऱ्यावर आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच आरोपींनी शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची माहितीही फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी आरोपींच्या विरोधात भादंवि कलम 118(2), 117(2), 118(1), 115(2), 352, 351(2)(3), 189(2), 191(2)(3), 190, 189 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोसई कर्डीले करीत असून, दाखल अंमलदार म्हणून पोलीस हवालदार जगदाळे (1844) कार्यरत आहेत.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुढील तपास सुरू आहे.