शिरूर शहरात मोटरसायकल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद – शिरूर पोलिसांची यशस्वी कारवाई
शिरूर शहरातील मोटरसायकल चोरी प्रकरणी पोलिसांनी जलद कारवाई करत एक सराईत चोरटा जेरबंद केला असून, त्याच्याकडून चोरीस गेलेली होंडा शाईन कंपनीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. शिरूर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ही कारवाई केली.
ही घटना दिनांक 28 मे 2025 रोजी सकाळी 11 ते 12.30 दरम्यान शिरूर मार्केट यार्ड परिसरात घडली. फिर्यादीने हँडल लॉक करून ठेवलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शहरात मोटरसायकल चोरीचे वाढते प्रकार लक्षात घेता पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, मिरज मिसाळ यांनी संयुक्त तपास करून आरोपीचा शोध घेतला.
तपासादरम्यान आरोपी बाबू गजानन थोरात (वय 35, रा. बोळेगाव, ता. अहिल्यानगर, जि.अहिल्यानगर) याचे नाव निष्पन्न झाले. नागापूर एमआयडीसी येथे शोधमोहीम राबवून त्याला अटक करण्यात आली. आरोपीकडून चोरीस गेलेली काळ्या रंगाची होंडा शाईन मोटरसायकल (एमएच 13 BJ 6927) हस्तगत करण्यात आली आहे.
प्राथमिक चौकशीत आरोपी हा पुणे ग्रामीण, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोटरसायकल चोरीसाठी कुख्यात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक श्री. संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांचे मार्गदर्शन लाभले.
ही कारवाई शिरूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली असून, पुढील तपास पोलीस हवालदार शिवाजी खेडकर करीत आहेत.
शहरवासीयांनी पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे कौतुक केले असून, पोलिसांकडून अशीच कार्यपद्धती सुरु राहिल्यास चोरीच्या घटनांवर प्रभावी अंकुश बसेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.