“देणार्याने दिले जेव्हा… विद्याधाममध्ये माजी विद्यार्थ्यांकडून प्रेमाने शालेय साहित्य वाटप”
शिरूर : “शिक्षण देई रूप नवे, आयुष्याला अर्थ देई जणू नवसंजीवनी” – विद्याधामच्या अंगणात काल हे शब्द जणू प्रत्यक्षात उतरले. २००३-०४ च्या १०क वर्गातील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या शाळेला व समाजाला आपलेपणाने, प्रेमाने आणि कृतज्ञतेने नमन करत गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा एक हृदयस्पर्शी उपक्रम हाती घेतला.
मे महिन्यात पार पडलेल्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात उरलेल्या निधीतून त्यांनी ठरवलं – “आम्ही आनंद साजरा करतोय, पण त्याच वेळी कुणाच्या डोळ्यातील आशेचे दिवेही पेटवूया.” या विचारातून १३ गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, कंपास पेटी, पेन इत्यादी शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
या छोट्याशा भेटीने लाभलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून उपस्थित प्रत्येकाचं मन भरून आलं. ही केवळ साहित्य वाटपाची घटना नव्हती, ती होती समाजासाठी आपुलकी जपणाऱ्या मनांची भेट.
या प्रसंगी प्राचार्य मा. श्री पाचर्णे, पर्यवेक्षक श्री देविकर, श्री नाईक, श्री देंडगे, श्री रासकर, श्री गायकवाड यांच्यासह १०क चे माजी विद्यार्थी श्री मयूर गादिया व श्री उदय सुकळे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमामुळे शाळा, माजी विद्यार्थी आणि सध्याचे विद्यार्थी यांच्यातील नातं अधिक घट्ट झालं. “शाळेची ओळख फक्त भिंतींची नसते, ती असते अशा माणसांच्या आठवणींनी आणि त्यांच्या मायेच्या संगतीने जिवंत राहणारी.” विद्याधामने हे पुन्हा सिद्ध केलं.