वडगाव रस्त्यावर नव्या पुलामुळे शेतकऱ्यांचा रस्ता बंद; सेवा रस्ता न केल्याने ‘जगण्याचा मार्ग’च खुंटला!
शिरूर (प्रतिनिधी)
“आमचं शेत जवळ असूनही आता ते गाठणं अशक्य झालंय… शेतीमाल सडतोय, मुलं शाळेला जायला रडतात, आणि आजारी माणूस उपचाराअगोदरच दमतो!” – वडगाव रस्त्यावरील एका शेतकऱ्याचे डोळे पाणावून हे शब्द उच्चारले गेले, आणि त्यातून संपूर्ण समस्येची तीव्रता समोर आली.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात वडगाव रस्त्यावर बेडकी नाल्यावर बांधण्यात आलेल्या नव्या पुलामुळे हजारो नागरिकांना दररोज जीवन-मरणाचा संघर्ष करावा लागत आहे. हा पूल, जो कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आला, तो केवळ एक वाहतूक प्रकल्प राहिला नाही… तो शेतकऱ्यांच्या आशा, स्वप्नं आणि जीवनाशी खेळ करणारा यंत्रणा अपयशाचा एक जिवंत पुरावा बनला आहे.
“सेवा रस्ता नाही, जीवन थांबलंय…”
या पुलामुळे वडगाव परिसरातील शेतकऱ्यांचा पारंपरिक रस्ता पूर्णतः बंद झाला आहे. या रस्त्याने शेतात जाणं, शेतीमाल बाहेर नेणं, मुलांना शाळेत पाठवणं आणि रुग्णांना दवाखान्यात नेणं शक्य होतं. परंतु आता पुलाची उंची १५ फूटांहून अधिक असल्यामुळे खाली जाण्यासाठी कोणतीही पर्यायी सेवा रस्त्याची व्यवस्था नाही.
शेतकरी गणेश रत्नपारखी यांचे म्हणणे मन हेलावून टाकणारे आहे – “ऊस घेऊन कारखाना/ गुऱ्हाळ पर्यत नेहणे कठीण होत आहे., पण ट्रॅक्टर तिथपर्यंत पोचत नाही. शेतातलं पिक तसंच पडून आहे… विकता येत नाही, खता घालता येत नाही. आम्ही कुठं जावं आता?”
विनवणीतून आंदोलनापर्यंतचा प्रवास
उद्धव ढवळे, देविदास भापकर, विठ्ठल शितोळे यांच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला आहे. या अर्जात स्पष्ट नमूद करण्यात आलंय की, पुलाच्या बांधकामावेळी ठेकेदाराने सेवा रस्त्याची कोणतीही तरतूद केली नाही.
परिणामी केवळ शेतकरीच नव्हे, तर विद्यार्थ्यांचे शिक्षण, आजारी व्यक्तींचा उपचार, आणि रोजच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करणंही कठीण झालं आहे.
“रस्ता दिला नाही तर आत्मदहन अटळ!”
या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक आणि भावनिक बाब म्हणजे शेतकऱ्यांनी दिलेला सामूहिक उपोषण व आत्मदहनाचा इशारा. “जर वेळेत उपाययोजना झाली नाही, तर प्रशासन जबाबदार राहील. आमचं आयुष्य या पुलाखाली दाबलं गेलंय, आता आम्हालाच शेवटचा मार्ग उरलाय.” – हे शब्द एका ज्येष्ठ शेतकऱ्याचे आहेत, जे आजही हातात नांगर घेऊन लढतोय, पण व्यवस्थेशी हरतोय.
प्रशासनाला अजून जाग येणार का?
हा पूल म्हणजे केवळ अपूर्ण विकासाचं प्रतीक नाही, तर नागरिकांवर लादलेली अन्यायाची रेषा आहे. स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांची मागणी केवळ सेवा रस्त्याची नाही, ती त्यांच्या जगण्याच्या हक्काची मागणी आहे.
प्रशासन आणि संबंधित विभागांनी ही समस्या वेळेत न सोडविल्यास, ती केवळ आंदोलनातच नव्हे तर एक मोठा जनआक्रोशात रूपांतरित होणार आहे, हे स्पष्ट आहे.
निष्कर्ष-
“विकास”ाच्या नावाखाली जर एखाद्याच्या जीवनाचं अव-सान तोडलं जात असेल, तर तो विकास नसून विनाश आहे. वडगावचा पूल विकासाचा मार्ग ठरेल की शेतकऱ्यांचा मृत्यूमार्ग? याचं उत्तर आता प्रशासनाला द्यावं लागेल.
✍️ विशेष प्रतिनिधी | RJNEWS27MARATHI.COM
(कृपया ही बातमी शेअर करा, तुमचं पाठबळ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे.)