July 17, 2025 4:45 am

राज्यात मान्सूनचा जोर वाढला; मुंबई, कोकण, पुणे व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा…

राज्यात मान्सूनचा जोर वाढला; मुंबई, कोकण, पुणे व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई | 19 जून 2025 : राज्यात पुन्हा एकदा मान्सूनचा जोर वाढल्याचे चित्र दिसत असून मागील 12 तासांपासून पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि नवी मुंबई परिसरात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पुढील चार दिवस राज्यात मान्सून सक्रिय

भारतीय हवामान विभागाने (IMD) 19 ते 22 जून दरम्यान महाराष्ट्रात मान्सून अधिक सक्रिय राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे आणि मान्सूनच्या सक्रियतेमुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये विविध स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट

मुंबईसाठी हवामान विभागाने आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून 70 मिमीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील निचांकी भागात पाणी साचण्याचा धोका असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गांवरील वाहतूक मंदावली आहे.

पुण्यात संततधार; लोणावळ्यात मुसळधार

पुण्यात आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली असून शहरातील अनेक भागात संततधार सुरू आहे. घाटमाथ्यावर, विशेषतः लोणावळ्यात, जोरदार पाऊस झाला असून गेल्या 24 तासांत 221 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा याच दिवशी 1166 मिमी पावसाची नोंद झाली आहे, जी मागील विक्रमांपेक्षा खूप अधिक आहे.

रायगड जिल्ह्यात शाळांना सुट्टी

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या आदेशानुसार अलिबाग, रोहा, तळा, महाड आणि पोलादपूर तालुक्यांतील सर्व शाळा व महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. काल झालेल्या पावसामुळे कुंडलिका नदीने इशारा पातळी गाठली आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.

इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

कोकण: पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत 19 जून रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा.

मध्य महाराष्ट्र: पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यांत घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता; 20 ते 22 जूनदरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज.

मराठवाडा: अहमदनगर, सोलापूर, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्यापासून मध्यम पावसाचा इशारा.

विदर्भ: अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया, वाशिम व भंडारा जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा अंदाज.

नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा

हवामान विभागाने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः डोंगराळ भागातील आणि नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, असा सल्ला देण्यात आला आहे. पर्यटनस्थळी जाणाऱ्या पर्यटकांनीही हवामानाची माहिती घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

विद्याधाम प्रशालेचा नवा यशविक्रमी टप्पा! शिष्यवृत्ती परीक्षेत ६१ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत घोडदौड ९ विद्यार्थ्यांचे राज्य गुणवत्ता यादीत नाव – वेदांश उदमले राज्यात तिसरा, जिल्ह्यात प्रथम…

best news portal development company in india

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

विद्याधाम प्रशालेचा नवा यशविक्रमी टप्पा! शिष्यवृत्ती परीक्षेत ६१ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत घोडदौड ९ विद्यार्थ्यांचे राज्य गुणवत्ता यादीत नाव – वेदांश उदमले राज्यात तिसरा, जिल्ह्यात प्रथम…