🚆 पुणेकरांना वाहतुकीतून दिलासा! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तळेगाव ते उरुळी कांचन पर्यंत नव्या रेल्वे मार्गाची घोषणा
शिरूर, प्रतिनिधी – पुणेकरांसाठी एक महत्त्वाची आणि भविष्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणारी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. पुणे शहराच्या वाढत्या वाहतूक कोंडीचा कायमस्वरूपी नायनाट करण्यासाठी तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन पर्यंत नवीन रेल्वे मार्ग तयार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
पुणे जंक्शनवरील ताण होणार कमी
पुणे रेल्वे जंक्शनवर दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमुळे आणि गाड्यांच्या गर्दीमुळे निर्माण झालेल्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या समर्पित मार्गामुळे पुण्यातून धावणाऱ्या काही प्रमुख गाड्यांचा भार कमी होऊन वाहतूक सुरळीत होणार आहे.
रूट कसा असेल?
हा प्रस्तावित लोहमार्ग तळेगाव दाभाडे ते चाकण, रांजणगाव मार्गे उरुळी कांचन असा असेल. या प्रकल्पामधून एकीकडे औद्योगिक वसाहतींना चालना मिळणार असून दुसरीकडे प्रवाशांची वाहतूकही अधिक गतीने होणार आहे.
२५ हजार कोटींचा खर्च, नवीन निविदा काढल्या
अजित पवार यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, या प्रकल्पासाठी सुमारे २५,००० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून यासाठी नवीन निविदा काढण्यात आल्या आहेत. रेल्वेशी समन्वय साधून हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित केला जाईल.
औद्योगिक विकासाला बूस्ट
चाकण आणि रांजणगाव या औद्योगिक पट्ट्यांमुळे या मार्गाला विशेष महत्त्व आहे. नवीन रेल्वे रूटमुळे या भागातील उद्योगधंद्यांना वाहतूक सुलभता मिळणार असून, उत्पादन व वितरण प्रक्रियाही गतीमान होईल. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळणार आहे.
सध्या सिग्नलवर थांबतात ७२ गाड्या
पुणे-दौंड आणि पुणे-लोणावळा या मार्गांवर सध्या क्षमतेपेक्षा अधिक गाड्या धावत आहेत. फलाट उपलब्ध नसल्यामुळे दररोज सुमारे ७२ गाड्यांना सिग्नलवर थांबवावे लागत आहे, ही मोठी समस्या आता दूर होणार आहे.
पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत क्रांती घडवणारा हा प्रकल्प फक्त रेल्वे व्यवस्थाच नव्हे तर औद्योगिक विकास, पर्यावरण आणि आर्थिक प्रगतीलाही हातभार लावणारा ठरणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणेकरांना केवळ प्रवासातच नव्हे तर संपूर्ण जीवनशैलीत सकारात्मक बदल जाणवणार, यात शंका नाही.
✍️ बातमी – [RJNEWS27MARATHI.COM]