बिल देण्याच्या कारणावरून तरुणावर खुर्चीने हल्ला; दोघांविरोधात रांजणगाव पोलिसांत गुन्हा दाखल
रांजणगाव (ता. शिरूर) : बिलाच्या वादातून तरुणास शिवीगाळ करत मारहाण करून लोखंडी खुर्चीने डोक्यात मारून जखमी करण्यात आल्याची घटना ढोकसांगवी येथे घडली असून, या प्रकरणी दोन जणांविरोधात रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी करण चंद्रकांत वाळुंज (वय २४, व्यवसाय – वॉटर सप्लाय, रा. पाचंगे वस्ती, ढोकसांगवी, ता. शिरूर, मूळ रा. गावडेवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १० जून २०२५ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास घडली.
फिर्यादी हे त्यांच्या कामानिमित्ताने ढोकसांगवी येथे असताना आरोपी अभि माकर आणि साहिल माकर (पूर्ण नावे माहिती नाहीत, दोघेही रा. ढोकसांगवी, ता. शिरूर) यांनी “आमचे जेवणाचे बिल देऊन टाक” असे म्हणत जबरदस्ती केली. फिर्यादीने ते नकार दिल्याने त्यांच्याशी वाद घालून शिवीगाळ, दमदाटी केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीस हाताने मारहाण केली आणि लोखंडी खुर्चीने त्यांच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली.
या हल्ल्यात फिर्यादीस डोक्याला जखम झाली असून, या प्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १० जून रोजी सायंकाळी घडली असली तरी ११ जून २०२५ रोजी दुपारी ४.५३ वाजता गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार इनामे हे करीत आहेत. सदर गुन्हा पोलीस हवालदार हुडे (क्रमांक २३३७) यांच्या फिर्यादीवरून नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
रिपोर्टर: रमेश मनोहर बानसोडे
RJNEWS27MARATHI.COM