शिरूरमध्ये मद्यधुंद ट्रक चालकाकडून तिन्ही कारांचे नुकसान – पोलिस हवालदाराने दिली फिर्याद
शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर तालुक्यातील अहिल्यानगर पुणे हायवे रोडवर गणेश मंदिरासमोर मध्यरात्रीच्या सुमारास एक गंभीर अपघात घडला. मद्यप्राशन करून ट्रक चालवणाऱ्या चालकाने तिन्ही कारांना धडक दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात पोलीस हवालदार शिवाजी बापूराव खेडकर (वय ४५, पो.ह. क्र. ३३२८, रा. शिरूर पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली असून आरोपीचे नाव श्रीमंत तुळशीराम घाडगे (रा. परळी वैजनाथ, जि. बीड) असे आहे.
घटना दिनांक १० जून २०२५ रोजी पहाटे १२.०५ वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपी श्रीमंत घाडगे हे ट्रक (क्र. एमएच १४ एलएक्स २१०५) मधून भरधाव व धोकादायक पद्धतीने वाहन चालवत होते. त्यांनी आधी एमएच २० ईई ४९९५ या कारला धडक दिली, आणि त्याचवेळी तिथे उभ्या असलेल्या एमएच १२ केटी ०४३७ व एमएच १६ डीएस ३६९४ या कारांचेही नुकसान केले.
दरम्यान, आरोपीने ट्रक चालवताना मद्यप्राशन केल्याचे निदर्शनास आले असून त्यामुळे अपघाताची तीव्रता वाढल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. घटनेबाबत कायदेशीर कारवाई करत आरोपीविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार २२१४ वाघमोडे करीत असून, गुन्हा पोलीस हवालदार ९८ भगत यांनी नोंदविला आहे. पुढील तपास प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.