रोहित्रातून ९० किलो तांब्याच्या तारा चोरीला – रांजणगाव सांडस येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे अज्ञात चोरट्याने रोहित्र फोडून सुमारे ९० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात शशिकांत राजाराम पाटोळे (वय ३१, रा. आंधळगाव, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, दिनांक १० जून २०२५ रोजी सकाळी ७:३० च्या सुमारास मौजे रांजणगाव सांडस गावाच्या हद्दीत असलेल्या गट नं. १५१ मध्ये, भिमा नदीच्या उत्तर काठावर असलेल्या रोहित्रावर अज्ञात चोरट्याने चढून ग्राईंडर मशीनच्या सहाय्याने रोहित्र कट केले. त्यानंतर रोहित्र खाली पाडून त्याचे ऑईल सांडवून नुकसान केले व रोहित्रातील अंदाजे ९० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा, अंदाजे किंमत ३६,००० रुपये, चोरून नेल्या.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९९/२०२५ भादंवि कलम १३६ सह कलम ३२४(३) नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा तपास सहायक फौजदार बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार (क्रमांक २२७१) गवळी करत आहेत. प्रकरणाचा अधिक तपास प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.