निकृष्ट रस्त्यांच्या निषेधार्थ शिरूरमध्ये मुंडण आंदोलन! सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळूंज यांचे आंदोलन पेटले, दोन महिलांनी केसांचे बट दिले शासनाला
शिरूर (प्रतिनिधी) :
शिरूर तालुक्यातील आमदाबाद ते मलठन रस्ता आणि त्यावरील कोंढाण ओढा पुलाच्या निकृष्ट व अपूर्ण कामांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांच्या रोषाला आता उग्र वळण मिळाले असून, सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळूंज यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सत्याग्रह आंदोलनाने सातव्या दिवशी मुंडण आंदोलनाचे स्वरूप घेतले आहे. शासनाच्या उदासीनतेच्या निषेधार्थ रविवारी (८ जून) वाळूंज आणि इतर कार्यकर्त्यांनी मुंडण करून आपला संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे दोन महिलांनी आपले केसांचे बट शासनाला भेट देत या अन्यायाविरुद्धचा आवाज बुलंद केला आहे.
आज आंदोलनाच्या ठिकाणी निलेश वाळूंज यांच्यासह सागर रासकर, दादाभाऊ कुरुंदळे, महिला कार्यकर्त्या कल्पना पुंडे, युवती मान्यता वाळूंज यांनी मुंडण करून प्रशासनाच्या झोपेचे वाजवले. यावेळी सुनिता वाखारे, सोनाली दसगुडे, भाऊसाहेब लाळगे, गौतम कुदळे, प्रताप दसगुडे, बबलू कुरुंदळे, अर्णव कुरुंदळे, ज्ञानदेव माऊली कुरुंदळे, शेखर कुरुंदळे, सोमनाथ देव्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या आगळ्या-वेगळ्या आंदोलनाची तालुकाभर चर्चा सुरू असून, जनतेचा शासनावरचा रोष उफाळून येत आहे. निलेश वाळूंज यांचे आंदोलन आता सामान्य जनतेच्या भावना व्यक्त करणारे व्यासपीठ ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ आणि मनमानी कारभारावर थेट आरोप करत वाळूंज यांनी सांगितले की, “निकृष्ट कामांमुळे जनता हैराण झाली आहे, ठेकेदारांना अभय देणारे अधिकारीच या भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहेत.”
मुख्य मागण्या:
आमदाबाद ते मलठन रस्ता आणि कोंढाण ओढा पुलाच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी.
दोषी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर त्वरित कठोर कारवाई.
याआधी झालेल्या सर्व अपूर्ण व निकृष्ट कामांचे जाहीर अहवाल प्रसिद्ध करावेत.
तालुक्यातील अन्य रस्त्यांच्या दुरवस्थेची सखोल चौकशी करावी.
गेल्या सात दिवसांपासून वाळूंज तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह करत आहेत. परंतु प्रशासनाने अजूनही याची दखल घेतली नसल्याने आता आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. निलेश वाळूंज यांनी जाहीर केले आहे की, सोमवार दिनांक ९ जूनपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येईल.
शासकीय दुर्लक्ष, वाढती लोकसंख्या आणि मूलभूत सुविधांचा अभाव या सगळ्यांनी मिळून शिरूर तालुक्यातील जनतेचा संताप शिगेला पोहचला आहे. आता हा आवाज शासन दरबारी पोहोचतो का? की तो देखील ‘फाईल’ मध्ये गहाळ होतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.