रस्त्याच्या कामात निष्पाप तरुणाचा बळी; शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटात भीषण अपघात!
शिरूर (पुणे) | प्रतिनिधी – शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा परिसरात रस्त्याचे काम सुरु असताना एक हृदयद्रावक घटना घडली. केवळ आपल्या रोजीरोटीसाठी राबणाऱ्या 25 वर्षीय तरुणाला अपघातात आपला जीव गमवावा लागला. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
गुरुवार, 6 जून 2025 रोजी सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास मांडवगण फराटा येथे कोळगाव डोळस रस्त्यावर हे दुर्दैवी अपघात घडला. समीर संतोष धायगुडे (वय 25, रा. अकोले, ता. इंदापूर, जि. पुणे) हा तरुण मजुरीवर रस्त्याचे काम करत असताना एम. एच. 13 सी. यू. 8776 क्रमांकाच्या टँकरने त्याला चिरडले.
टँकर चालक दत्तात्रय अभिमन्यू साळुंखे (रा. सवारी, ता. निलंगा, जि. लातूर) याने बेपर्वाईने वाहन चालवत असताना वाहनावरील नियंत्रण गमावले. रस्त्याच्या कडेला असलेले बॅरिगेट्स तोडत उजव्या बाजूला वळण घेतले आणि समीर चक्राखाली आला. अपघात इतका भयंकर होता की, त्याचे डोके, उजवा हात आणि बाजूचा बरगडीचा भाग पूर्णपणे चिरडला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर समीरचा भाऊ सूरज धायगुडे याने शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोहेवा/1572 मोरे करत आहेत.
ही घटना केवळ एक अपघात नाही, तर अशा कामांमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्यामुळे दररोज होणाऱ्या दुर्घटनांचा एक गंभीर इशारा आहे. कामगारांची सुरक्षितता, वाहतुकीचे नियोजन आणि वाहनचालकांचे प्रशिक्षण – या सगळ्या बाबींना नव्याने गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे.
🕯️ आम्ही ‘RJNEWS27MARATHI.COM‘ तर्फे समीर धायगुडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि संबंधितळअधिकाऱ्यांनी कठोर पावले उचलावीत अशी मागणी करतो.