केडगाव नोंदणी कार्यालयात ‘दलालराज’!
शासकीय दस्तऐवजांची उलथापालथ, कारवाईचा अभाव — सर्वसामान्यांची प्रचंड अडचण
केडगाव (प्रतिनिधी) –
केडगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालय सध्या खासगी दलालांच्या अघोषित ताब्यात गेल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना कार्यालयात थेट प्रवेश नाकारून, दलालांच्या माध्यमातूनच व्यवहारांची पूर्तता केली जात असल्याचे धक्कादायक प्रकार उघड झाले आहेत. यामुळे शासकीय कार्यालयातील पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.
‘शासनाचे कार्यालय की दलालांचे धंदा?’
शेतकरी, भूमीधारक व सामान्य नागरिक जमीन खरेदी-विक्रीसाठी केडगाव नोंदणी कार्यालयात गर्दी करीत आहेत. परंतु, त्यांच्या नोंदणीची प्रक्रिया थेटपणे पार पडण्याऐवजी त्यांना दलालांकडे जावे लागत आहे. या दलालांकडे दस्त नेण्यात आले, की काम तत्काळ होते, अन्यथा लोकांना अनेक वेळा हेलपाटे मारावे लागतात. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक दलाल प्रत्यक्ष कार्यालयात बसूनच व्यवहार पूर्ण करतात, आणि अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात.
शासकीय दस्तांची बिनधास्त उलथापालथ
अत्यंत संवेदनशील असलेल्या “प्रतिबंधात्मक अभिलेख कक्षात” दलाल सर्रासपणे प्रवेश करतात आणि तिथे शासकीय कागदपत्रांमध्ये हात घालतात, ही बाब अत्यंत गंभीर आहे. शासकीय दस्तांचा गैरवापर, माहितीची चोरी, किंवा दस्त नोंदणीतील बदल या शक्यतांमुळे या प्रकारांना गुन्हेगारी स्वरूप प्राप्त झाले आहे.
प्रभारी अधिकाऱ्यांची ‘मूक संमती’?
केडगाव नोंदणी कार्यालयात चालणाऱ्या या गैरकारभारामागे प्रभारी अधिकाऱ्यांची ‘मूक संमती’ असल्याची शंका नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दस्त नोंदणीच्या वेळी कार्यालयाच्या बाहेर पक्षकारांना बसवून दलालांना आत प्रवेश दिला जातो, हे प्रकार शासकीय कार्यालयाच्या गंभीर अपयशाकडे बोट दाखवत आहेत.
नोंदणीची प्रतीक्षा, निषेधाची तीव्रता
दोन दिवसांपासून दस्तांची स्कॅनिंग प्रक्रिया रखडल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दस्त नोंदवले गेले असतानाही त्याची प्रत मिळत नसल्यामुळे संबंधित व्यक्ती दररोज कार्यालयात येत असून, कार्यालयाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.
दुय्यम निबंधक सुनील जोशी यांनी या स्थितीबाबत कबुली देत सांगितले की, “नोंदवलेले दस्त आहेत. स्कॅनिंग रखडल्यामुळे लोक येत आहेत.”
खासगी दलालांचा संचार, अपंगांची फरफट
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे अध्यक्ष गणेश गायकवाड यांनी सांगितले की, “मी स्वतः काही दिवसांपूर्वी दस्त नोंदणीसाठी गेलो होतो. दलालांनी मध्यस्थी केली तरच नोंदणी केली जात होती. अपंग नागरिकांसाठी कोणतीही सुविधा नाही. कर्मचारी ओळखपत्र न लावता काम करतात, त्यामुळे दलाल आणि कर्मचाऱ्यांमधील फरक कळत नाही.”
गुन्हे दाखल, तरीही कार्यवाहीचा अभाव
या सर्व परिस्थितीला अनुसरून यवत पोलीस ठाण्यात काही दलालांविरोधात बेकायदेशीर दस्त नोंदणी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण प्रत्यक्षात दलालांचा वावर आणि दडपशाही अद्याप सुरूच आहे.
सुधारणा मागणीचा आवाज बुलंद
केडगाव नोंदणी कार्यालयातील या प्रकरणावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून:
सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी
प्रभारी अधिकाऱ्यांची चौकशी करावी
दलालांना कार्यालयात प्रवेशबंदी करावी
कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सक्तीचे करावे
अशा ठोस उपाययोजनांची मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा येणाऱ्या काळात हा कार्यालय ‘घोटाळ्याचे केंद्र’ बनण्यास वेळ लागणार नाही.