शिक्रापूर-गणेगाव-मंचर रस्त्याची दयनीय अवस्था, नागरिक आणि विद्यार्थ्यांचा जीव मुठीत
शिरूर प्रतिनिधी-
शिक्रापूर, गणेगाव, मलठण, जांबुत, मंचर या गावांना जोडणारा प्रमुख मार्ग आज अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे. शिक्रापूर ते मंचरपर्यंतच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून हा रस्ता आता वाहतुकीसाठी निखळ संकट बनला आहे. रस्त्याच्या दुरवस्थेकडे संबंधित विभागाने केलेले दुर्लक्ष ही या भागातील नागरिकांसाठी मोठी शोकांतिका ठरत आहे.
जीवनाची किंमत खड्ड्यांत मोजावी लागते!
या रस्त्याने दररोज शालेय विद्यार्थी, कामगार, व्यावसायिक, शेतकरी, रुग्ण आणि हजारो सामान्य नागरिक प्रवास करतात. पुणे, रांजणगाव औद्योगिक वसाहत, शिक्रापूर या ठिकाणी जाण्यासाठी या रस्त्यावर अवलंबून रहावे लागते. मात्र, रस्त्यावरील खड्डे इतके खोल आणि जास्त आहेत की वाहन चालवताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. अनेक अपघातांचे सत्र सतत सुरू असून, रात्रीच्या वेळी ही स्थिती अधिक भयानक होते.
रस्ता की खड्ड्यांत रस्ता?
शिक्रापूर-गणेगाव-मलठण रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले असून, या मार्गावरील अनेक ठिकाणी दोन वाहने एकमेकांना ओव्हरटेक करू शकत नाहीत. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली काटेरी झाडं आणि कुंपण यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. एक वाहन खड्डा चुकवत असताना दुसरे त्याच खड्ड्यात अडकते – परिणामी अपघात अनिवार्य.
नागरिकांचा उद्रेक: आंदोलनाची शक्यता
रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात संतप्त ग्रामस्थांनी आवाज उठवला आहे. गणेगाव येथील मा. ग्रामपंचायत सदस्य संतोष भोगावडे, संतोष झांजे सर, नवनाथ बांगर, प्रकाश गाडेकर, बाळासाहेब बांगर, शिवाजी माकर, सोमनाथ काळे, अतुल भोगावडे, तात्यासाहेब बांगर, राजेंद्र माकर आणि योगेश झांजे यांनी रस्त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
विशेष चौकट: अपघातांचा केंद्रबिंदू – कामिनी ओढ्यावरील पूल
गणेगाव येथील कामिनी ओढ्यावरील पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून अर्धवट सोडले गेले आहे. या ठिकाणी शाळकरी मुले-मुलींचा जीव धोक्यात घालून खड्डे चुकवत प्रवास करावा लागतो. अनेक अपघात या पुलाजवळ घडले असून नागरिक जखमी झाले आहेत. या परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर, ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मा. उपसरपंच प्रमिला संतोष भोगावडे यांनी दिला आहे.
सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याची ही शेवटची वेळ आहे. अन्यथा या दुर्लक्षित रस्त्यावर कुणाचा जीव जाईल, हे सांगता येत नाही.