– “शेती की तळं?” – उरळगावात शेतशिवार जलमय, शेतकरी हवालदिल!
विजय कांबळे – प्रतिनिधी | RJNEWS27MARATHI.COM
शिरूर तालुका, उरळगाव –
“शेती की तळं?” असा प्रश्न विचारावा लागेल अशी भयावह परिस्थिती सध्या शिरूर तालुक्यातील उरळगाव परिसरात पाहायला मिळते आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्याने संपूर्ण शेतशिवार जलमय झाले असून, काही ठिकाणी तर शेतजमिनीवरून वाहून आलेले पाणी स्थायिक होऊन तेथील शेती तळ्याच्या रूपात परावर्तित झाली आहे.
गेल्या पन्नास वर्षांतील रेकॉर्ड ब्रेक अवकाळी पाऊस यावर्षी शेतकऱ्यांच्या उरावर घाव घालून गेला आहे. शेतात पेरलेली पिकं वाहून गेली असून, जमिनीतील सुपीक मातीचा थरही अनेक ठिकाणी उध्वस्त झाला आहे. शेतकरी अक्षरश: हवालदिल झाले आहेत. बांध फुटले, खाचखळगे तयार झाले आणि अनेकांचे शेत ओळखू येणार नाही अशा स्थितीत पोहचले.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे –
ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नामदेव गिरमकर याविषयी म्हणाले,
> “शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. पण आज त्याच्या पदरी फक्त संकटं आली आहेत. सरकारने वेळीच हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली पाहिजे. ही मदत म्हणजे शेतकऱ्याला पुन्हा उभं करण्याची संधी असेल.” पंचनामे करून कागदी घोडे मिरवण्यापेक्षा सरसकट सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी .
गावातील नागरिकांच्या मते, शेतीची ही अवस्था पाहता शासनाच्या यंत्रणांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करायला हवे. तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांनी मिळून या भागाचे वास्तव सरकारपुढे मांडणे गरजेचे आहे.
शेतकरी सामजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बाजीराव कोकडे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले,
> “संपूर्ण शेती पाण्यात आहे. पिकं गेली,माती वाहून गेली. आता पुढे काय? कर्ज कसं फेडायचं? याचं उत्तर कोणी देणार?”
उरळगावसारख्या भागात झालेलं नुकसान पाहता राज्य सरकारने तात्काळ विशेष पॅकेज जाहीर करावं, अन्यथा शेतकऱ्यांचे आत्मविश्वासासकट आयुष्य उद्ध्वस्त होईल, असा इशारा स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ देत आहेत.
“शेती की तळं?” – पाण्यात बुडालेलं भविष्य!
या बातमीच्या माध्यमातून RJNEWS27MARATHI.COM शासनाचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधत असून, शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सज्ज आहे.