शिरूर एमआयडीसीतून 3300 ब्रास मुरूम गायब! — जमीनचाच ‘चोरी’चा मोठा घोटाळा उघडकीस
शिरूर तालुक्यातील करडे एमआयडीसी भागात मुरूम चोरीचा एक गंभीर प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मालकीची 3300 ब्रास मुरूम अज्ञात व्यक्तीने अनधिकृतपणे उत्खनन करून चोरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यासंदर्भात शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.
फिर्यादी मिलिंद रामचंद्र कासार (वय 56 वर्षे, रा. मीतिला नगरी, पिंपळे सौदागर, पुणे) यांनी दिलेल्या माहितीवरून 27 मे 2025 रोजी रात्री 9.25 वा. शिरूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ही घटना दिनांक 16 मे 2025 रोजीच्या सुमारास घडली असून, करडे एमआयडीसी येथील गट क्रमांक 115/अ (1 हेक्टर 2 आर), 115/ब (1 हेक्टर 2 आर), 115/6 (2 हेक्टर 4 आर) तसेच गट क्रमांक 107 (5 हेक्टर 7 आर) या जमिनींमधून एकूण 3300 ब्रास मुरूम बेकायदेशीरपणे उत्खनन करून चोरून नेण्यात आले. सदर मुरूमची बाजारभावानुसार किंमत अंदाजे 19 लाख 80 हजार रुपये इतकी आहे.
सदर प्रकार उघडकीस येण्यासाठी फिर्यादीने 16 मे रोजीच पंचासमक्ष पाहणी केली होती. त्यानंतर 23 मे रोजी मंडळ अधिकारी, निमोणे यांच्या कडून अधिकृत पंचनामा प्राप्त झाल्यानंतरच त्यांनी आज, 27 मे रोजी पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत तक्रार नोंदवली.
पोलिसांनी या प्रकरणी गु. र. नं. 361/2025 अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई पोलीस हवालदार शिंदे (2463) यांच्या दाखलतेने व पो. ह. भोते (1252) यांच्या तपासाखाली सुरु आहे. प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांचं मार्गदर्शनही या प्रकरणी घेतलं जात आहे.
या प्रकारामुळे एमआयडीसीत सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, इतक्या मोठ्या प्रमाणावर मुरूम चोरीला गेल्याने अनेकांची कानउघाडणी झाली आहे. मुरूम चोरीसाठी वापरले गेलेले जेसीबी आणि डंपर नेमके कोणाच्या मालकीचे होते, या मागे कोणते माफिया कार्यरत आहेत याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तपासमोहीम सुरू आहे.
⛔ प्रशासन आणि पोलिसांपुढे आता मोठं आव्हान उभं राहिलं आहे — या ‘मातीमाय’च्या लुटीचा सूत्रधार नेमका कोण? हे समजणं काळाच्या गर्भात दडलंय!