वाहत्या पाण्यात माणुसकीचा आधार: अनुष्का फराटे हिच्या धाडसाने गोपीनाथ आबा शेलार यांना दिला आधार
अल्लाउद्दीन अलवी | प्रतिनिधी, ता. मांडवगण फराटा
मांडवगण फराटा ते कोळगाव मार्गावरील इनामदार वस्तीकडे जाणाऱ्या ओढ्याला पावसामुळे मोठा पूर आल्याने, तसेच संबंधित ठिकाणी पूलाचे काम सुरू असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून टाकण्यात आलेल्या नळ्यांचा पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे.
आज याच धोकादायक ठिकाणी गोपीनाथ आबा शेलार हे पाण्याच्या वेगाचा अंदाज न आल्याने आपल्या मोटारसायकलसह पाण्यात पडले. अचानक खोल पाण्यात गेल्याने त्यांची स्थिती अडचणीत आली होती. मात्र, याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या एका शाळकरी मुलीच्या धाडसाने त्यांचे प्राण वाचले.
ही धाडसी मुलगी म्हणजे कु. अनुष्का धनंजय फराटे — छत्रपती विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संस्थापक चेअरमन मा. संभाजीनाना फराटे यांचीनात. अनुष्का इयत्ता १० वीमध्ये शिक्षण घेत असून, ती त्या दिवशी क्लासहून घरी परत येत होती.
घटनेच्या वेळी अनुष्का पुलाच्या कडेला उभी होती. अचानक पाण्यात पडलेल्या शेलार आबांना पाहून तिने क्षणाचाही विलंब न करता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली. त्या वेळेस पुलावर गुडघ्याएवढे पाणी वाहत होते. तिने शेलार यांना धीर देत मोटारसायकल पकडायला सांगितले आणि स्वतः ती मोटारसायकल ओढत त्यांना सुरक्षित बाहेर काढले.
अनुष्काच्या या धाडसी कृतीमुळे एक मोठा अनर्थ टळला. तिचे धाडस, प्रसंगावधान आणि माणुसकीची भावना संपूर्ण मांडवगण फराटा पंचक्रोशीत कौतुकाचा विषय ठरत आहे.
“अनुष्का तुझ्या कार्याला मनापासून सलाम,” अशा शब्दांत संपूर्ण गावकऱ्यांनी तिच्या धाडसाला दाद दिली आहे. अशा धाडसी मुलीचा आदर्श इतरांनी घ्यावा अशी भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.
अनुष्का, तू खरंच ‘लहान पण महान’!