– पावसाने अडवलेला संसार : रोहिणी थोरात यांची व्यथा
मांडवगण फराटा (प्रतिनिधी) –
“पावसाचे दिवस म्हणजे आमच्यासाठी आभाळ फाटल्यासारखे असतात. ना घरात प्रवेश करता येतो, ना घराबाहेर पडता येतं. पाण्याने वेढलेलं जीवन… आणि तेही वर्षानुवर्षे!” हे आर्त शब्द आहेत रोहिणी शामराव थोरात यांचे, जे मांडवगण फराटा येथे मागील १५ वर्षांपासून वास्तव्यास आहेत.
पावसाळा सुरु झाला, की त्यांच्या घराभोवती पाण्याचे तळे साचतात. त्यांच्या दोन घरांना या साचलेल्या पाण्याने वेढा घातलेला असतो. मुलांना शाळेत पाठवायचे, की त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यायची – ही रोजची दुविधा झाली आहे.
पूर्वी या भागात पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी एक नैसर्गिक चारी होती. परंतु, जमिनीचा मालक बदलल्यावर जागा विकली गेली आणि ही चारीच नामशेष झाली. “आजही त्या जागेत चाऱ्यांचे पाईप्स जमिनीत दिसतात, पण त्यांचा उपयोग कुणी करत नाही. त्याची डागडुजी करायला कुणीही पुढे येत नाही,” थोरात यांचे सांगणे आहे.
“घरात लहान मुलं आहेत, जर पाण्यात पडून काही घडलं तर त्याला जबाबदार कोण असेल?” असा थेट सवाल करत त्यांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर ताशेरे ओढले.
रोहिणी थोरात यांनी प्रशासनाकडे पुन्हा एकदा मागणी केली आहे
“पूर्वी जिथे चाऱ्यांचा मार्ग होता, त्या मार्गांची तातडीने डागडुजी करण्यात यावी, आणि आम्हाला या जलदु:खातून बाहेर काढावे. आमचा जगण्याचा मार्ग मोकळा करावा.”
पावसाचे दिवस आनंदाचे असतात, पण रोहिणी थोरातांसारख्या नागरिकांसाठी ते भीतीचे आणि वेदनेचे कारण बनले आहेत. प्रशासनाने या व्यथेला गांभीर्याने घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशीच अपेक्षा आहे.
RJNEWS27MARATHI.COM