“आई… वाचव!” – चिमुकल्या ईशांतच्या हाकेनं हादरलं शिरूर; मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात १७ जण जखमी, नागरिक भयभीत
शिरूर, प्रतिनिधी
“
आई… वाचव!” हे शब्द ऐकून एक आई धावत घराबाहेर आली आणि समोरचं दृश्य पाहून तिचा हृदय पिळवटून गेला. सहा वर्षांचा निष्पाप ईशांत रक्ताने माखलेला होता… त्याच्या चेहऱ्यावर भीती होती, अंगावर जखमा… कारण फक्त एवढंच की तो घराबाहेर खेळत होता.
शिरूर शहरातील गुजर कॉलनी परिसरात मोकाट कुत्र्यांनी मांडलेला उच्छाद अखेर जीवघेणा ठरू लागला आहे. २५ मे रोजी दोन पिसाळलेल्या कुत्र्यांनी खेळत असलेल्या ईशांत राजेंद्र दारोळे याच्यावर हल्ला केला. ईशांत गंभीर जखमी असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पण त्याच्या घरच्यांसाठी ही जखम फक्त शारीरिक नाही, तर मनात घर करून बसलेला एक आघात आहे.
“बालपण धोक्यात आलंय!” – संतप्त महिला रस्त्यावर
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण आहे. “आमची मुलं आता खेळायला बाहेरही जाऊ शकत नाहीत,” असं सांगताना सविता दारोळे यांचे डोळे पाणावले होते. त्यांनी थेट नगरपरिषदेला सवाल केला – “किती बळी लागणार अजून? एखादं अपत्य कायमचं हरवले कीच का जाग येणार?”
सामाजिक कार्यकर्त्या, गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत प्रशासनाला झणझणीत जाब विचारला आहे. “नुसतं निर्बिजीकरण पुरेसं नाही, ही माणसांची सुरक्षा आहे की प्रयोगशाळा?” असा आक्रोश अनेक महिलांनी केला.
पिसाळलेल्या कुत्र्यांचा दहशतवाद सुरूच
गेल्या दोन वर्षांपासून दोन विशिष्ट कुत्र्यांकडून परिसरात भीती निर्माण झाली आहे. काळ्या व पांढऱ्या रंगाची ही कुत्रं लहान मुलं, वृद्ध नागरिक यांच्यावर सतत हल्ले करत आहेत. देवांश पळसकर या ६ वर्षाच्या मुलाला तीनदा कुत्र्यांनी चावल्याचं उदाहरण पुरेसं बोलकं आहे.
“आज ईशांत, उद्या कोण?” – माजी नगरसेवकांचा इशारा
माजी नगरसेवक विठ्ठलराव पवार यांनी स्पष्ट इशारा दिला – “जर तातडीने उपाय झाले नाहीत, तर उद्या एखादा निष्पाप जीव गमवावा लागेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषदेवर असेल.”
प्रशासनाकडून केवळ आश्वासनं
शिरूर नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय बर्गे यांनी नेहमीप्रमाणे ‘प्रयत्न सुरू आहेत’ असं सांगून जबाबदारी झटकली. “ती कुत्री खूप हुशार आहेत, सापडत नाहीत,” असं कारण पुढे करत त्यांनी उदासीनतेची परिसीमा गाठली.
रोजच्या जगण्याचाच संघर्ष
आज शिरूरमधील नागरिक कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे रस्त्यावर चालण्यासही घाबरत आहेत. ज्येष्ठ नागरिक, व्यायामप्रेमी, कामावरून रात्री उशिरा घरी येणारे युवक, मुलं-मुली… सगळ्यांनाच आता सार्वजनिक जागा असुरक्षित वाटू लागल्या आहेत.
नागरिकांची एकच मागणी – सुरक्षितता
“शहर सुंदर करा, पण आधी सुरक्षित करा!” अशी साद नागरिकांनी लावली आहे. मोकाट कुत्र्यांच्या त्रासातून सुटका हवी, हे मागणं आता फक्त सामाजिक नाही, तर मानवी हक्काचं प्रश्न बनलं आहे.
अशाच बातम्यासाठी rjnews27मराठीत. com क्लीक करा