“वादळी पावसातही थांबले नाही हात – वायरमन सोनू तावरे यांचा झंझावाती कार्यकरतृत्व!”
अल्लाउद्दीन अलवी, प्रतिनिधी | ता. २५, बाभुळसर बुद्रुक, ता. शिरूर, जि. पुणे
वादळी वाऱ्याचा जोर, सतत कोसळणारा पाऊस, आणि डोळ्यासमोर अंधार – अशी भीषण स्थिती असताना देखील महावितरणचा वायरमन संजय उर्फ सोनू तावरे यांनी जिद्द, धैर्य आणि अपार मेहनतीने देवाचे माळ येथील ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती करून गावकऱ्यांच्या मनात विजेचा उजेड परत आणला.
उदनशा बाबा ए. जी. परिसरातील ट्रान्सफॉर्मर पावसामुळे अचानक बंद पडला होता. मांडवगण फराट्याचे महावितरणचे कार्यकारी अभियंता इर्शाद शेख यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संजय तावरे व बाभुळसार बू गावातील सहकारी वायरमन अविनाश थोरात व त्यांच्या टीमने मुसळधार पावसात देखील अखंडपणे काम करत बिघाड दुरुस्त केला.
या कार्याबद्दल गावच्या सरपंच दिपालीताई नागवडे यांनी शेख साहेब, वायरमन तावरे आणि संपूर्ण टीमचे विशेष कौतुक करत स्वागत केले.
“पावसामुळे विजेची तार तुटणे, खांब वाकणे, झाडे कोसळणे यामुळे वीज पुरवठा विस्कळीत होतो. अशा वेळी वायरमन काम करत असताना नागरिकांनी संयम ठेवून त्यांना सहकार्य करावे,” असे आवाहन सरपंचांनी माध्यमांशी बोलताना केले.
महावितरणचे अभियंता इर्शाद शेख यांनीही नागरिकांना आवाहन करत सांगितले की, “वीज फॉल्ट, तार तुटणे अथवा खांब वाकण्याच्या घटना ताबडतोब ऑफिसला कळवा. आणि सर्वांनी सतर्क राहा. विजेच्या तारांना हात न लावता, तत्काळ माहिती महावितरणला द्या.”
संकटाच्या काळात झोकून देऊन काम करणाऱ्या वायरमन सोनू तावरे यांचे कार्य खरोखरच ‘कौतुकास्पद’ असून, अशा कर्मचाऱ्यांमुळेच खेड्यापाड्यांतील अंधार पळवला जातो, हे नक्की!