अपघातातून थोडक्यात बचाव: कोरेगाव चौफुला रस्त्यावर झाड कोसळले, दुचाकीस्वार सुखरूप
शिक्रापूर-चाकण हायवेवरील कोरेगाव चौफुला रस्त्यावर रविवारी सकाळच्या सुमारास एक मोठा अपघात टळला. रस्त्याच्या कडेला खोदलेल्या चरामध्ये उभे असलेले एक मोठे झाड अचानक कोसळले आणि मोटरसायकलवरून जात असलेल्या व्यक्तीच्या अंगावर पडले. मात्र सुदैवाने या अपघातातून दुचाकीस्वार थोडक्यात बचावला.
विनायक सातपुते असे या दुचाकीस्वाराचे नाव असून, ते नेहमीप्रमाणे सकाळी मोटरसायकलवरून प्रवास करत होते. कोरेगाव चौफुला परिसरात पोहोचताच अचानक एक जुने व मोठे झाड त्यांच्या दिशेने कोसळले. झाडाचा काही भाग त्यांच्या अंगावर आदळला, मात्र मोठा अनर्थ टळला. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतीसाठी जेसीबी बोलावण्यात आली. जेसीबीच्या साहाय्याने झाड रस्त्यावरून हटवण्यात आले आणि वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
या घटनेमुळे काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या कडेला खोदलेल्या चऱ्यामुळे झाडांची मुळे उघडी पडली असून त्यामुळे झाड पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने अशा झाडांची वेळेवर छाटणी करणे किंवा ती सुरक्षितपणे हटवणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.