“आईचा हुंदका आणि एका बहिणीचा आक्रोश; मयुरीसाठी न्यायाची याचना”
पुणे – वैष्णवी हगवणे प्रकरणाने महाराष्ट्र हादरवले असतानाच आता आणखी एक मन हेलावून टाकणारी बाब समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपींच्या जाचाला केवळ वैष्णवी नव्हे, तर तिची जाऊ मयुरीही बळी ठरली होती. मयुरीच्या आई लता जगताप यांनी लिहिलेलं हृदयद्रावक पत्र महाराष्ट्र राज्य महिला आयोगापर्यंत पोहोचलं असून, त्या पत्रात मयुरीवर झालेल्या अमानुष अत्याचारांची कथा मांडण्यात आली आहे.
एका आईचा हुंदका…
माझ्या लेकरावर इतकं अत्याचार होईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं,” असं लिहीत लता जगताप यांनी त्यांच्या मुलीला तिच्या सासरच्यांकडून मिळालेल्या छळाची संपूर्ण कहाणी मांडली आहे. त्या पत्रात त्यांनी सासरच्या मंडळींनी मयुरीवर केलेल्या मानसिक, शारीरिक आणि लैंगिक अत्याचारांचं काळजाला चिरणाऱ्या शब्दांत वर्णन केलं आहे.
हुंड्याच्या हव्यासाने पेटलेलं सासर…
2022 मध्ये सुशील हगवणे याच्याशी मयुरीचं लग्न झालं. लग्नाच्या काहीच महिन्यांत मयुरीच्या सासरच्यांनी फॉरच्युनर गाडी आणि मोठ्या प्रमाणात रोख पैशांची मागणी करत तिचा छळ सुरू केला. घरात पती नसताना सासरे, सासू, दिर, नणंद यांनी मिळून तिला मारहाण करणे, शिवीगाळ करणे, धमकावणे – हे तिचं रोजचं आयुष्य बनलं.
“तुला वडील नाहीत, तुझ्या अपंग भावालाही मारून टाकू!”
या शब्दांनी जगताप कुटुंबाच्या काळजावर जणू शहारे उमटवले. “आमच्याकडे बंदुका आहेत, आमचा मेहुणा मोठा पोलिस अधिकारी आहे,” अशा धमक्यांमुळे मयुरी आणि तिच्या आई-भावांवर सतत मानसिक तणावाचा डोंगर होता.
अत्याचाराचा कळस..
6 नोव्हेंबर 2024 हा दिवस मयुरीच्या आयुष्यात काळा दिवस ठरला. त्या दिवशी सासरच्या चारही जणांनी तिच्यावर पुन्हा एकदा अमानुष अत्याचार केले. सासऱ्याने तिच्या शरीराला हात लावला, दिराने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन मारहाण केली, तिचे कपडे फाडले गेले. “तुला मुलगा होत नाही, म्हणून तुला घराबाहेर काढतो,” असं म्हणत तिचा अपमान केला.
मयुरीने धाडस करून या सर्वाची रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा दिर तिचा फोन हिसकावून पळाला. तशीच ती रस्त्यावर त्याच्या मागे धावत गेली – ही घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
आशा आणि अपेक्षेचा कागद…
या सगळ्याचा परिणाम म्हणजे मयुरीच्या आई आणि भावाने महिला आयोगाला लिहिलेलं पत्र – हे केवळ तक्रारपत्र नाही, तर एका आईच्या फाटलेल्या काळजाचा हुंदका आहे. “आमच्या मुलीस न्याय मिळावा, आणि आमच्या कुटुंबाला संरक्षण मिळावं,” ही विनवणी त्यांनी केली आहे.
न्याय कुठे आहे?
हा सवाल आता समाज आणि यंत्रणेकडे आहे. जेव्हा स्त्रीच्या जगण्याचा, तिच्या आत्मसन्मानाचा, आणि तिच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो, तेव्हा व्यवस्था गप्प का बसते? मयुरीसारख्या अनेक मुली या देशात अजूनही अन्याय, अत्याचार सहन करत आहेत. त्यांचा आवाज फक्त पत्रांमध्येच बंदिस्त राहू नये, तो न्यायालयापर्यंत पोहोचायला हवा.
आज मयुरी न्यायासाठी लढतेय – तिच्यासाठी उभं राहणं, ही समाजाची जबाबदारी आहे.