महसूल यंत्रणेवर हल्ला की स्त्रीसन्मानाला सुरुंग? — महिला मंडळ अधिकाऱ्याला दमबाजीप्रकरणी तलाठी संघाचा संताप; कडक कारवाईची मागणी……
शिरूर (प्रतिनिधी)
शासनाच्या यंत्रणेतील महिलांचे सशक्तीकरण हे केवळ कागदावरच उरते का? हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे, शिरूर तालुक्यातील महिला मंडल अधिकारी माधुरी वसंत बागले यांच्यावर करण्यात आलेल्या अश्लील शिवीगाळी व धमकीप्रकरणी. या गंभीर प्रकारामुळे महसूल यंत्रणेतील महिला अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
घटनेची माहिती अशी की, माधुरी बागले या मलठण येथे मंडल अधिकारी म्हणून कार्यरत असून, त्यांच्याकडे पूर्वी टाकळी हाजी मंडळाचा देखील अतिरिक्त कार्यभार होता. २० मे रोजी दुपारी १.३० वाजता, शिनगरवाडी (टाकळी हाजी) येथील खातेदार भानुदास खामकर यांनी रस्ता प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बागले यांना मोबाईलवरून संपर्क केला. संवादाऐवजी सुरू झाली अपशब्दांची लक्तरं — एवढंच नव्हे तर खामकर यांनी “तुला बघून घेईन” अशी उघड धमकी दिल्याचा आरोप आहे.
या अमानवी प्रकाराचा महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने तीव्र निषेध नोंदवला असून, संबंधित खातेदारावर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी जोरदार मागणी संघटनेने केली आहे. यासंदर्भात एक निवेदन तहसीलदार बाळासाहेब मस्के यांना देण्यात आले.
निवेदन सादर करताना मंडल अधिकारी आबासाहेब मोरे, मनीषा राऊत, अनिता भालेराव, दीपाली नवले यांच्यासह तब्बल २० पेक्षा अधिक महसूल अधिकारी उपस्थित होते. संघटनेने प्रशासनाला दोन दिवसांची मुदत दिली असून, या कालावधीत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या घटनेमुळे एकीकडे महिला कर्मचाऱ्यांच्या सन्मानाचा आणि आत्मसन्मानाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे अधिकारी वर्गावर होणाऱ्या हल्ल्यांचे दैनंदिन स्वरूप ही चिंतेची बाब ठरत आहे.
प्रशासनाकडून आता केवळ कारवाई नव्हे, तर अशा प्रकारांना आळा बसवण्यासाठी ठोस धोरण अपेक्षित आहे. महिला अधिकाऱ्यांवर होणारी अशी बिनधास्त धमकी म्हणजे कायद्याला आणि व्यवस्थेला दिलेला थेट अपमानच नव्हे काय?