June 20, 2025 9:57 am

कवडीमोल बाजारभावाच्या काळात विजेचा तडाखा – महाळूंगे पडवळमध्ये शेतकऱ्याच्या कांदा बराखीस आग, संपूर्ण साठा जळून खाक

कवडीमोल बाजारभावाच्या काळात विजेचा तडाखा – महाळूंगे पडवळमध्ये शेतकऱ्याच्या कांदा बराखीस आग, संपूर्ण साठा जळून खाक

शिरूर प्रतिनिधी – रमेश बनसोडे

संपूर्ण महाराष्ट्रासह आंबेगाव तालुक्यात सध्या अवकाळी पावसाने थैमान घातले असून, काही ठिकाणी या पावसाचे फायदे दिसत असतानाच, काही ठिकाणी मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले आहे. अशीच एक हृदयद्रावक घटना महाळूंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथे घडली असून, विजेच्या तडाख्यामुळे एका शेतकऱ्याच्या आयुष्याची पुंजी क्षणार्धात भस्मसात झाली आहे.

शेतकरी सुनील बबन चासकर यांच्या शेतातील कांद्याच्या बराखीवर सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास जोरदार विजेचा आघात झाला. यामध्ये संपूर्ण बराखीसह त्यामध्ये साठवलेला कांदा जळून खाक झाला. संपूर्ण हंगामभर मेहनतीने घेतलेले कांद्याचे उत्पादन, भविष्यातील संकटाला तोंड देण्यासाठी साठवून ठेवले होते. परंतु एका क्षुल्लक विजेच्या तडाख्याने हे सर्व धुळीला मिळाले.

ही बराखी गावाच्या सरपंच सौ. सुजाता चासकर यांच्या घराजवळच असल्यामुळे तातडीने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले, मात्र बराखी लाकडी असल्यामुळे आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. परिणामी, संपूर्ण कांदा जळून गेला व शेतकऱ्याच्या आशा-आकांक्षांवर पाणी फिरले.

भावनिक व आर्थिक आघात

या घटनेमुळे चासकर कुटुंबियांवर केवळ आर्थिकच नाही, तर भावनिक आघातही झाला आहे. सध्याच्या काळात कांद्याला बाजारात अत्यंत कमी भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी कांदा विकण्याऐवजी साठवून ठेवत आहेत, आशेने की भविष्यात चांगला भाव मिळेल. पण या घटनेने चासकर यांचा हा संपूर्ण साठा आणि मेहनत एका क्षणात राख झाली.

ग्रामस्थांची शासन दरबारी मागणी

या दुर्घटनेची तातडीने पंचनामा करून शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. शासनाच्या विविध योजनांअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झाल्यास मदत मिळते, मात्र त्यासाठी घटनास्थळी तत्काळ पंचनामा होणे आवश्यक आहे.

मेहनत राख झाली…’

कांदा हे पीक शेतकऱ्यांना रक्त आटवून घ्यावे लागते. बी-बियाणं, खतं, मजुरी, पाणी यावर हजारो रुपये खर्च करावा लागतो. नफा मिळेल या आशेने कांद्याची साठवणूक केली जाते. मात्र बाजारात मिळणारा कवडीमोल भाव आणि त्यातच निसर्गाचा कहर – हे चित्र आता सामान्य झाले आहे. सुनील चासकर यांच्यासारख्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीने उध्वस्त केल्यावर शासनाने तातडीने मदतीचा हात दिला पाहिजे, अन्यथा शेतकऱ्यांचा विश्वास आणि जिवंतपणा हरवेल – अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें