Rjnews27 मराठी यांची विशेष बातमी
जमीन वादातून उभा ऊस चोरीला – तिघांविरोधात गंभीर गुन्हा दाखल
(शिरूर प्रतिनिधी-
जमिनीच्या वादातून उभा ऊस चोरी करून नेल्याचा प्रकार शिरूर तालुक्यातील निमोणे येथे घडला असून, याप्रकरणी तिघांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
गुन्हा रजिस्टर नं. 346/2025 नुसार, संबंधित आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 303(2), 329(3), व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सौ. ज्योती शिवाजी जाधव (वय 42, व्यवसाय – शेती, सध्या रा. विश्रांतवाडी, पुणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या मूळच्या निमोणे, ता. शिरूर, जि. पुणे येथील असून, गट नंबर 1064/1/अ मधील एक एकर शेती जमीन खरेदी केली होती. सदर जमिनीत त्यांनी ऊस लावलेला होता.
दि. 19 मे 2025 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास, त्या आपल्या गावी आले असता, त्यांना लक्षात आले की त्यांचे उभे ऊस पीक तोडून नेण्यात आले असून, संपूर्ण क्षेत्रावर नांगरणीही केलेली होती. त्यानंतर केलेल्या चौकशीतून असे उघडकीस आले की, ऊस चोरीस व नांगरणीस कारणीभूत ठरलेले इसम म्हणजे शेजारील शेतकरी महादेव भगवान लाड याने, फिर्यादीच्या जमिनीचे मुळ मालक आरूणा नाना काळे व नाना सोनबा काळे यांच्या मदतीने ही चोरी केल्याचा आरोप आहे.
फिर्यादीने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सदर तीनही आरोपींनी संगनमत करून, बेकायदेशीररित्या जमिनीत प्रवेश करून 20 महिन्यांचा उभा ऊस तोडून नेला व नंतर शेतात नांगरणी केली. हा प्रकार अतिशय गंभीर स्वरूपाचा असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करून त्यांच्या मालकीच्या हक्कावर घाला घालण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालेदार टेंगले (2499) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून, गुन्हा पोलीस अंमलदार राऊत (3300) यांच्या हस्ते दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक पातळीवर संताप व्यक्त
या घटनेमुळे निमोणे गावातील शेतकरी वर्गात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी व पिकांवर अशी आगळीक करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
पुढील तपास सुरू असून Rjnews27 मराठी या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे.