मांडवगण फराटा येथे हुमणी नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्याचे प्रात्यक्षिक – शेतकऱ्यांना मार्गदर्शन व योजनांची माहिती
प्रतिनिधी : अल्लाउद्दीन अलवी | Rjnews27 मराठी | ता. १९ मे | मांडवगण फराटा (ता. शिरूर, जि. पुणे)
मांडवगण फराटा येथे खरीप हंगाम पूर्वतयारी अंतर्गत हुमणी नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्याचे सविस्तर प्रात्यक्षिक प्रगतशील शेतकरी धनंजय ज्ञानदेव फराटे यांच्या प्रक्षेत्रावर घेण्यात आले. उस पिकामध्ये मोठ्या प्रमाणात हानी करणाऱ्या हुमणी कीडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आधुनिक व पर्यावरणपूरक उपाय म्हणून प्रकाश सापळा वापरण्याचे महत्त्व कृषी विभागाने अधोरेखित केले.
या प्रात्यक्षिक प्रसंगी तालुका कृषी अधिकारी श्रीमती सुवर्णा आदक मॅडम यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “हुमणी ही उसातील अतिशय घातक कीड आहे. तिचे नियंत्रण सुरुवातीच्या अवस्थेत केल्यास कीटकनाशकांच्या खर्चात मोठी बचत होऊ शकते. प्रकाश सापळा हे एक प्रभावी व पर्यावरणास हितकारक तंत्रज्ञान आहे.”
याच कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत केळी लागवड, PMFME (प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना), महाडीबीटी पोर्टलवरील अनुदानित योजना, यांसारख्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
त्याचबरोबर स्मार्ट योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या VNF फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या कांदाचाळ प्रकल्पास भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून अधिक माहिती दिली.
मंडळ कृषी अधिकारी अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामपूर्व तयारीच्या अनुषंगाने बीज प्रक्रिया, बियाण्यांची उगम क्षमता तपासणी, रासायनिक खतांचा संतुलित वापर व सुपर केन नर्सरीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास कृषी पर्यवेक्षक कांतीलाल वीरमानल, शिवाजी गोरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन कृषी सेविका अश्विनी वंजारी मॅडम यांनी केले होते. कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक पांडुरंगअण्णा फराटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विविध योजनांची माहिती, तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून राबवलेला हा उपक्रम निश्चितच प्रभावी ठरणार असून खरीप हंगामात शाश्वत शेतीच्या दृष्टीने दिशा दाखवणारा ठरेल.