औद्योगिक क्षेत्रात दहशतीचा सावट!
चार अनोळखी हल्लेखोरांचा तरुणावर पाईप-दांडक्यांनी प्राणघातक हल्ला….
रांजणगाव एमआयडीसी | प्रतिनिधी
शहरातील औद्योगिक प्रगततेला काळी छाया पडली असून, रांजणगाव एमआयडीसीतील सवेरा मोल्डिंग कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका युवकावर चार अनोळखी इसमांनी अंगावर शहारा आणणारा प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ही घटना 15 मे रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घडली असून, औद्योगिक परिसरातील सुरक्षेवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जखमी युवकाचे नाव पियुष विष्णू चव्हाण (वय 25, रा. गोलेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) असे आहे. तो रोजच्या प्रमाणे कामावरून आपल्या दुचाकी (MH 12 HY 8489) वरून घरी जात असताना चार इसमांनी त्याला आडवून, “तुला खूप माज आलाय का?” असे म्हणत दमदाटी केली. त्यानंतर एका इसमाने डोक्यात हाताने मारहाण केली आणि उर्वरित तिघांनी हातातील प्लास्टिक पाईप व लाकडी दांडक्यांनी त्याच्या डोक्यावर, पाठीवर व अंगावर जबर मारहाण केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पियुष गंभीर जखमी झाला.
गंभीर जखम झाल्यानंतर पियुषने मोठ्या प्रयत्नांनी स्वतःला सावरत रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी गु.र.नं. 157/2025 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात चार इसमांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलीस हवालदार इनामे तपास करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व स्थानिकांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जात आहे.
या घटनेनंतर रांजणगाव औद्योगिक परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, कामगार व स्थानिकांमध्ये सुरक्षा यंत्रणेवर संताप व्यक्त होत आहे.
औद्योगिक भागातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, स्थानिक प्रशासन व पोलिसांपुढे यापुढील अशा घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
– Rjnews27 मराठी
रिपोर्टिंग टीम | शिरूर