शिरूर तालुक्यात 4 लाखांची फसवणूक; नऊ जणांवर गुन्हा दाखल
शिरूर प्रतिनिधी – रमेश बनसोडे
शिरूर (ता. पुणे) – तालुक्यातील आलेगाव पागा येथील शेतकरी शरद लक्ष्मण आसवले यांनी त्यांच्या गु-हाळासाठी मजूर उपलब्ध करून देतो, असा विश्वास निर्माण करून तब्बल चार लाख अठ्ठावीस हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी शरद लक्ष्मण आसवले (वय २८) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२४ ते ७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत कुणाल ताराचंद मालचे (रा. खामखेडा, ता. धरणगाव, जि. जळगाव) याने “तुमच्या गु-हाळावर मजूर देतो” असे सांगून, आपल्या साथीदारांसह आले. यामध्ये रामा लक्ष्मण भिल, बापु सदा भिल, शांताराम सोमा भिल, गोरख रामचंद्र भिल, नाना नामदेव भिल, संजय शांताराम भिल, विठोबा पंडीत भिल, संजय सुरसिंग सोनवणे (सर्व रा. वराड बुद्रुक, ता. धरणगाव, जि. जळगाव) यांचा समावेश आहे.
आरोपी कुणाल मालचे आणि ईश्वर लक्ष्मण भिल यांनी फिर्यादीकडून प्रत्येकी ५०,००० रुपये प्रमाणे ४ लाख रुपये रोख उचल दिले. याशिवाय कुणाल मालचे याने मे २०२४ ते १९ ऑक्टोबर २०२४ दरम्यान १,२८,००० रुपये ऑनलाईन फोन पेद्वारे घेतले. या व्यवहारावर ६ सप्टेंबर २०२४ रोजी मौजे एंडोल (ता. एरंडोल, जि. जळगाव) येथे रजिस्ट्री (क्र. १५९२/२०२४) करून, कुणाल मालचे व ईश्वर भिल यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या होत्या.
मात्र, आरोपींनी कामगार न पाठवता व घेतलेली रक्कम परत न करता फिर्यादीची विश्वासघाताने फसवणूक केली. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. ३४०/२०२५ अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार भोते (क्र. १२५२) करत आहेत.
गुन्हा दाखल करण्याची नोंद १७ मे २०२५ रोजी रात्री ११:४४ वाजता एन्ट्री नं. ५७/२०२५ म्हणून झाली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे (शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.