शाळेच्या सुट्टीचा गैरवापर – मांडवगण फराटा परिसरात स्कूल बसचा प्रौढांच्या प्रवासासाठी वापर; प्रशासन मौन
प्रतिनिधी – श्री. औदुंबर फटाले – Rjnews 27 मराठी
मांडवगण फराटा : सध्या राज्यभरात लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू आहे. त्यातच शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्याने शिक्षण संस्था बंद आहेत. याच संधीचा गैरवापर करत अनेक शिक्षण संस्थांचे चालक आणि बसमालक शाळेसाठी असलेल्या बसचा वापर प्रौढ व्यक्तींना लग्नसमारंभासाठी ने-आण करण्यासाठी करीत असल्याचे प्रकार मांडवगण फराटा परिसरात उघड होत आहेत.
वाघेश्वर मंदिर परिसरात सुट्टीच्या दिवशी अनेक स्कूल बस प्रौढ लोकांना घेऊन उभ्या असतात. हे बस दिवसभर एका ठिकाणी उभ्या राहतात. संबंधित पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षेत्रात असतानाही या बेकायदेशीर प्रवासावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
शालेय वाहतूक ही केवळ विद्यार्थ्यांसाठीच असते. मात्र सुट्टीच्या कालावधीत या बसचा सर्रास गैरवापर करून जादा पैसे मिळवण्याच्या हेतूने त्यांचा वापर लग्नकार्य, इतर खाजगी प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात केला जात आहे. शासनाच्या नियमांनुसार शालेय बसचा असा व्यावसायिक वापर करण्यास बंदी आहे. तरीही संबंधित यंत्रणांकडून दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
या प्रकारात एक अत्यंत गंभीर बाब म्हणजे अपघात घडल्यास त्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रौढ व्यक्तींना विमा संरक्षण मिळणार का? विमा पॉलिसी शालेय विद्यार्थ्यांसाठीच असते, अशा परिस्थितीत अशा बसचा प्रौढांसाठी वापर होणे धोकादायक ठरू शकते. याचा विचार मात्र प्रवास करणारे लोक अजूनही करीत नाहीत.
मांडवगण फराटा परिसरात विविध जिल्ह्यांतून येणाऱ्या शालेय बसची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गावकऱ्यांमध्ये तसेच लग्नाला आलेल्या पाहुण्यांमध्येही या प्रकाराविरोधात तीव्र नाराजी आहे. पोलिस प्रशासन, परिवहन विभाग आणि शिक्षण संस्थांकडून या बाबीकडे तात्काळ लक्ष देणे आवश्यक आहे.या गंभीर विषयावर सातत्याने आवाज उठवला असून, नागरिकांच्या हितासाठी या बेकायदेशीर प्रवृत्तींवर लवकरात लवकर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सर्वसामान्य ग्रामस्थांनी केली आहे.