अपघाताची गंभीर घटना भरधाव वेगातील गाडीच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू, गुन्हा दाखल
शिरूर (ता. 18 मे) – शिरूर तालुक्यातील तांदळी गावाच्या हद्दीत भरधाव वेगात आलेल्या चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून, याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सतीश दिलीप शिंदे (वय 38, व्यवसाय शेती, रा. इनामगाव, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या माहितीवरून महेश शिवाजी तावले (रा. श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 338/2025 नुसार भारतीय दंड विधान कलम 186(1), 125(अ)(ब), 281, 324(4) तसेच मोटार वाहन अधिनियमाचे कलम 184, 134/177 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही दुर्घटना 1 मे 2025 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सुमारास मौजे तांदळी, ता. शिरूर, जि. पुणे येथील कळसकरवाडी परिसरात घडली. महेश तावले याने महिंद्रा कंपनीची चारचाकी (क्रमांक MH14GA8624) भरधाव व हयगईने चालवत शेतकरी दिलीप दगडू शिंदे (वय 50 वर्षे) यांच्या ताब्यातील बजाज सीटी 110 एक्स दुचाकी (क्रमांक MH12TP4081) ला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत दिलीप शिंदे यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या अपघातात दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फिर्यादी सतीश शिंदे हे मयत दिलीप शिंदे यांचे पुत्र असून, त्यांनी आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
या प्रकरणी पोलीस नाईक बनकर यांनी फिर्याद नोंदवली असून, पुढील तपास पोलीस नाईक गवळी करीत आहेत. शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
( पोस्ट केलेला काल्पनिक फ़ोटो आहे )