मुलीच्या लग्नाच्या दिवशी शेतकऱ्याची मोटारसायकल चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
शिरूर, ता. 17 मे 2025 (प्रतिनिधी) — मुलीच्या लग्नाच्या दिवशी आनंदाच्या वातावरणात व्यस्त असताना एका शेतकऱ्याच्या मोटारसायकलवर चोरट्यांनी डोळा ठेवत ती लंपास केल्याची घटना तालुक्यातील आमदाबाद येथील गोसावी मळा येथे घडली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
फिर्यादी उद्धवगिरी मोहनगिरी गोसावी (वय 56 वर्ष, व्यवसाय शेती, रा. गोसावी मळा, आमदाबाद, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजता त्यांनी त्यांच्या घरासमोरील अंगणात त्यांच्या मालकीची होंडा कंपनीची ड्रीम युगा मोटारसायकल (क्रमांक MH 12 PW 1952) पार्कींग करून ठेवली होती. त्याच दिवशी त्यांच्या मुलीचे लग्न असल्याने ते मळगंगा लॉन्स येथे विवाह कार्यक्रमासाठी गेले होते.
संध्याकाळी सातच्या सुमारास घरी परतल्यानंतर त्यांनी पाहिले असता, घरासमोर उभी केलेली मोटारसायकल जागेवरून गायब होती. त्यांनी परिसरात सर्वत्र शोधाशोध केली, मात्र ती कुठेही आढळून आली नाही. अखेर, मोटारसायकल चोरीस गेल्याची खात्री झाल्यावर त्यांनी तातडीने शिरूर पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.
चोरीस गेलेली मोटारसायकल सुमारे ३०,००० रुपये किमतीची असून ती काळ्या रंगाची असून तिचा चेसिस नंबर ME4JC5BDJHT052096 व इंजिन नंबर JC58ET6052196 असा आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने स्वतःच्या फायद्यासाठी, कोणतीही परवानगी न घेता लबाडीच्या उद्देशाने ही मोटारसायकल चोरून नेली आहे.
या प्रकरणी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) अंतर्गत गु. र. नं. 332/2025 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दाखल होण्याची वेळ 17 मे रोजी रात्री 1:44 अशी असून, याची नोंद एन्ट्री नं. 06/2025 मध्ये घेण्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार उबाळे (क्र. 1898) करीत असून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थांत या चोरीमुळे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्याचा शोध घेऊन मोटारसायकल परत मिळवावी, अशी मागणी होत आहे.