कानगावच्या आर.ओ. पाण्यावर भटक्या श्वानांचा कब्जा! – ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर धोका, प्रशासन झोपेत!
कानगाव प्रतिनिधी | ‘औदुंबर फटाले. Rjnews27 मराठी
कानगाव ग्रामपंचायतीच्या आर.ओ. (रिव्हर्स ऑस्मोसिस) पाणी शुद्धिकरण योजनेतून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पुरवले जाते. मात्र या अत्यावश्यक योजनेच्या पाण्याच्या नळाजवळ भटक्या श्वानांनी पाणी प्यायल्याचा प्रकार समोर आला असून, त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण झाला आहे.
गावात फिरणाऱ्या श्वानांनी थेट आर.ओ. फिल्टरच्या पाईपवर तोंड लावून पाणी प्यायल्याचे दृश्य समाजसेवक श्री. भरत फडके यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले आहे. त्यांनी हा गंभीर प्रकार उजेडात आणून गावकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंता व्यक्त केली आहे.
श्वानांच्या लाळेमुळे विविध रोगजंतू पाण्यात मिसळण्याची शक्यता असते. विशेषतः जर ते श्वान पिसाळलेले असतील, तर रॅबीजसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका अधिकच वाढतो. अशा पाण्याचे सेवन केल्यास नागरिकांच्या व त्यांच्या कुटुंबांच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनीही वेळोवेळी दिला आहे.
सध्या गावांमध्ये भटक्या श्वानांची संख्या प्रचंड वाढली असून, उघड्यावर फेकलेले अन्न खाल्ल्याने व एकमेकांना चावा घेण्याच्या प्रकारांमुळे त्यांच्यात पिसाळण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे केवळ नागरिकच नव्हे तर जनावरांनाही धोका निर्माण झाला आहे.
शासनाचे दुर्लक्ष – जनतेचा संताप
ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पाणी पुरवण्याची जबाबदारी असताना, अशा घटना घडत असतील तर प्रशासनाचे नियोजन व निरीक्षण यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. “फिल्टर कोणत्याही संस्थेचा असो, त्याची स्वच्छता व देखभाल ही ग्रामस्थांच्या आरोग्याशी थेट निगडीत आहे,” असे ठाम मत श्री. भरत फडके यांनी व्यक्त केले आहे.
ग्रामस्थांची मागणी : त्वरित उपाययोजना करा!
गावातील नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनास तसेच खाजगी फिल्टर चालकांना योग्य सूचना देऊन, भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
– पाण्याच्या फिल्टर पाइपजवळ संरक्षक जाळी बसवावी
– भटक्या श्वानांचे निर्बंध व नियंत्रण योजना आखावी
– नियमितपणे पाईप्स व फिल्टरची स्वच्छता करावी
– नागरिकांना जागरूक करणारे फलक व सूचना लावाव्यात
जनहितार्थ कामे करताना सूक्ष्म गोष्टींकडे लक्ष देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पाण्यासारख्या मूलभूत गरजेतून रोगराई पसरली, तर त्याचे दुष्परिणाम संपूर्ण गावाला भोगावे लागतात.
या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन प्रशासनाने कार्यवाही करावी, हीच ग्रामस्थांची अपेक्षा आहे.