“अपघाताची वाट पाहताय का प्रशासन? मांडवगण फराटा येथे आठवडे बाजारात भर रस्त्यावर दुकाने – जीव धोक्यात!”
प्रतिनिधी – औदुंबर फटाले ( Rjnews27marathi,)
मांडवगण फराटा (ता.शिरूर )
सातत्याने वाढणाऱ्या रहदारीसह नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या व्यवस्थेचा चटका मांडवगण फराटा येथील आठवडे बाजार दिवशी पहावयास मिळत आहे. बाजारतळामध्ये भरपूर जागा असतानाही काही व्यापारी भर वाहतुकीच्या मुख्य रस्त्यावर दुकाने थाटत असून त्यामुळे ग्राहकांचा आणि वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे.
प्रत्येक शुक्रवारी या गावात मोठा बाजार भरतो. आसपासच्या गावांमधून व्यापारी आणि ग्राहक मोठ्या संख्येने येथे येतात. मात्र, बाजारतळाच्या व्यवस्थापनाचा अभाव आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे बाजार रस्त्यावरच भरतो आहे. त्यामुळे खरेदी करत असताना ग्राहक रस्त्यावर उभे राहत असून दोन्ही बाजूने भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांच्या कचाट्यात सापडण्याचा धोका वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर सामाजिक भान जपत दि. 16 मे 2025 रोजी ग्रामपंचायत मांडवगण फराटा यांना लेखी मागणी अर्ज देण्यात आली. त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले की, भर रस्त्यावर थाटल्या जाणाऱ्या दुकानांमुळे अपघाताची शक्यता अधिक आहे. एखाद्या वाहनचालकाचे दुर्लक्ष झाल्यास संभाव्य दुर्घटना घडू शकते आणि त्याची जबाबदारी कोण घेणार, हा खरा प्रश्न आहे.
बाजारतळात जागा असूनही ती रिकामी राहते आणि दुकाने रस्त्यावर भरतात, हे पाहता यामध्ये स्थानिक प्रशासनाचा व्यवस्थापनातील अक्षम्य हलगर्जीपणा दिसून येतो. शहरांप्रमाणे सायंकाळनंतर येथे वाहनांची गर्दी प्रचंड वाढते. अशा वेळी वाहने रस्त्यातून वळवण्याचा मार्गच न राहत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढण्याचा धोका कायम राहतो.
दरम्यान, अशा घटना देशभरात अनेक ठिकाणी घडल्याचे आपण बातम्यांमध्ये वाचत आणि पाहत असतो. अपघातानंतर प्रशासन पंचनामा करते, पण त्याआधीच जर खबरदारी घेतली असती तर जीव वाचले असते, हे लक्षात घेण्याची वेळ आता आली आहे.
त्यामुळे पुढील आठवडे बाजारापूर्वीच प्रशासनाने रस्त्यालगत दुकाने लावणाऱ्या व्यावसायिकांना बाजारतळात जागा उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा उद्भवणाऱ्या दुर्घटनेसाठी प्रशासन आणि बाजार समिती जबाबदार राहतील, अशी रोषाची भावना स्थानिक नागरिकांमध्ये आहे.
मीडिया पत्रकार- औदुंबर फटाले ( Rjnews27मराठी )