दि. 13 मे 2025, मंगळवार
शिरूर हादरलं! तांबे वस्तीतील धडाकेबाज चोरी – चोरट्यांनी घर फोडून उचलला 2.80 लाखांचा माल!
छप्परफाड चोरी! बंद घरात शिरून सोनं-रोख पळवले – बुलढाणा व संभाजीनगरच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
शिरूर (ता. 13 मे) – (न्हावरे ) पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात चोरट्यांनी धडाकेबाज कामगिरी करत तांबे वस्ती येथील बंद घर फोडून सुमारे 2 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या चोरीने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
ही घटना 9 मे रोजी सायंकाळी 5:30 ते 7:00 च्या दरम्यान घडली असून संकेत बाजीराव साठे (वय 30, रा. तांबे वस्ती, शिरूर) यांनी याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी साठे यांचे घर कुलूप लावून बंद असताना चोरटे घराच्या मागील खिडकीवरून छतावर चढले आणि उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करून ही धडाकेबाज चोरी केली. त्यांनी घरातून खालीलप्रमाणे माल चोरून नेला:
₹1,50,000/- रोख रक्कम (500 रुपयांच्या 300 नोटा)
₹1,20,000/- किंमतीची सोन्याची चैन व अर्धा तोळ्याची गणपती मूर्ती
₹10,000/- लहान मुलांच्या बचत डब्ब्यातील नोटा व चिल्लर
आईच्या नावाची एफ.डी.ची कागदपत्रे
या प्रकरणी पोलिसांनी अर्जुन बबन राठोड (रा. देऊळगाव कुंडपाळ, जि. बुलढाणा) व करण विनोद चव्हाण (रा. उंबरखेडा, जि. संभाजीनगर) यांच्याविरुद्ध गु. र. नं. 321/2025, भा.दं.वि. कलम 305, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
गुन्ह्याची नोंद सहाय्यक फौजदार रमेश कदम यांनी केली असून तपास पो.ह. 398 दीपक पवार करत आहेत. पोलीस पथके आरोपींचा शोध घेत असून लवकरच आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.
या चोरीमुळे तांबे वस्ती परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिकांनी पोलिसांनी चोख गस्त आणि सुरक्षा वाढवावी, अशी मागणी केली आहें