शिरूर बसस्थानकात दुपारी भरदिवसा महिलेला ४.६८ लाखांचे दागिने लंपास
शिरूर (प्रतिनिधी) : शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या शिरूर एस.टी. बसस्थानकात दुपारी भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील व कानातील एकूण ४ लाख ६८ हजार ८०० रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना ११ मे २०२५ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी सौ. रूपाली अनिल काळे (वय ४८, व्यवसाय: गृहिणी, रा. त्रिमूर्ती नगर, भिगवण रोड, जळोची, बारामती) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या आपल्या मुलगी तन्त्री आणि भाची साक्षीसोबत एस.टी. बसने बारामती येथे जाण्यासाठी शिरूर येथील बसस्थानकात आल्या होत्या. त्या केडगाव चौफुला जाणाऱ्या एस.टी. बस क्र. एम.एच.१४ बी.टी. ४१९३ मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ६.५ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण आणि १३ ग्रॅमचे सोन्याचे झुबे असा एकूण ४ लाख ६८ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
ही घटना घडल्यानंतर सौ. काळे यांनी तत्काळ शिरूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलीस उपनिरिक्षक पो.ह.वा. जगताप (क्र.२५) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. सदर गुन्हा गु.र.नं. ३१४/२०२५ अन्वये भारतीय दंड विधान BNS 303(2) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.
शिरूर बसस्थानकासारख्या गजबजलेल्या परिसरात भरदिवसा घडलेली ही चोरीची घटना महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणत आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.