रस्ता वादातून तिघांना मारहाण; सहा जणांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा
निमगाव दुडे (ता. शिरूर) | दि. 11 मे 2025
रस्ता करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका शेतकऱ्यासह त्याच्या पत्नी आणि भावजयला मारहाण केल्याची घटना शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे येथे घडली. या प्रकरणी सहा जणांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी काशिनाथ दादाभाऊ वागदरे (वय 50, रा. निमगाव दुडे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी (11 मे) दुपारी 1.30 च्या सुमारास रस्ता तयार करण्याच्या कारणावरून आरोपी खंडू भाऊसाहेब शिंदे, रखमा शिंदे, योगेश उत्तम शिंदे, राहुल उत्तम शिंदे आणि इतर दोन ते तीन अनोळखी इसम (सर्व रा. शिंदेवाडी, मलठण, ता. शिरूर) यांनी वागदरे, त्यांची पत्नी सुनीता व भावजय लिलाबाई यांना हाताने, दगडाने आणि काठीने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गु. र. नं. 315/2025 अन्वये BNS कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3), 191(2), 191(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद सायंकाळी 7:49 वाजता करण्यात आली असून, याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बनकर करीत आहेत.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.