“मोफत शिक्षण हक्काचा विसर! निकालासाठी शाळेने विद्यार्थ्यांना रडवले, फी भरल्याशिवाय निकाल नाकारला!”
मांडवगण फराटा प्रतिनिधी-औदुंबर फटाले,
मांडवगण फराटा येथील श्री वाघेश्वर विद्याधाम या शिक्षण संस्थेने दिनांक 1 मे 2025 रोजी विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचा निकाल देण्याऐवजी, फी न भरल्याच्या कारणावरून निकाल रोखल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मोफत शिक्षण हक्क कायदा लागू असलेल्या अनुदानित संस्थांमध्ये येणारी ही शाळा, हा कायदा धाब्यावर बसवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शाळेने पाचवी ते नववी इयत्तेतील काही विद्यार्थ्यांकडून 700-800 रुपयांची फी न भरल्याच्या कारणावरून त्यांना निकाल नाकारला. काही विद्यार्थी निकालासाठी शाळेत आले असता, त्यांच्या हातात निकाल न पडल्याने निराश होऊन रडत घरी परतले. काही विद्यार्थ्यांनी मोबाइल समोर भावना व्यक्त करत स्पष्ट सांगितले की, “आम्ही फी भरली नाही म्हणून निकाल दिला नाही!”
या प्रकारामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त होत असून, शिक्षण हे विद्यार्थ्यांचा अधिकार आहे की व्यापाऱ्यांची देणी! असा सवाल विचारला जात आहे.
श्री वाघेश्वर विद्याधाम ही जर शासन अनुदानित संस्था असेल, तर मोफत शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्व विद्यार्थ्यांना भयमुक्त, आनंददायी व नि:शुल्क शिक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यात निकाल देण्यासाठी फी मागणे म्हणजे कायद्याचे सरळ उल्लंघन आहे.
या पार्श्वभूमीवर जन आवाज क्राईम न्यूजतर्फे संस्थेचे सचिव आणि प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे की, उशिरा का होईना, परंतु सर्व विद्यार्थ्यांना निकाल देण्यात यावा आणि भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी योग्य ती कारवाई करण्यात यावी.
तसेच, जून महिन्यात हा संपूर्ण प्रकार, शाळेकडून घेतलेल्या फीचे पुरावे, आणि विद्यार्थ्यांच्या भावना यांचे व्हिडिओ सादर करून शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येणार आहे.
शिक्षण हक्काचा मुलांसोबत असा गळा घोटला जाणार असेल तर ‘मोफत शिक्षण’ ही संकल्पना फसवी ठरत आहे का?’ — हा प्रश्न आता संपूर्ण राज्यासमोर उभा राहिला आहें.